टॉप न्यूज

स्थानिक साहित्यिक निमंत्रणाविनाच

मुश्ताक खान

मुश्ताक खान, श्री. ना. पेंडसेनगरी - साहित्य संमेलनातली रुसव्या-फुगव्यांची परंपरा कोकण मराठी साहित्य संमेलनातही पाळली गेलीय. म्हणजे झालंय असं की या संमेलनासाठी महाराष्ट्रभरातल्या साहित्यिकांना निमंत्रणं गेली. त्यांनी संमेलनाला हजेरीही लावली. पण गंमत अशी की भूमिपुत्रांना अर्थात स्थानिक साहित्यिक, कवींनाच या संमेलनाचं साधं निमंत्रणही देण्यात आलेलं नाही. हे साहित्यिकही 'बोलावणं आल्याशिवाय नाही...' असे रुसून बसलेत. रसिक मात्र या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त करतायत.

 

मुळात स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं आणि अगदी खेड्यापाड्यांतून साहित्यिक निर्माण व्हावेत, या निखळ हेतूनं कोमसापची स्थापना झाली. पण हा हेतूच या संमेलनात मोडीत काढण्हयात आलाय, अशी भावना व्यक्त होतेय.

स्थानिक साहित्यिक सुनील कदम, इक्बाल मुकादम आणि मंगेश मोरे यांनी राज्य पातळीवरील कवितेत आपला ठसा उमटवला आहे. तर ज्येष्ठ पर्यावरणवादी व साहित्यिक दिलीप कुलकर्णी यांनी अनेक पुस्तकांच्या माध्यमातून लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. असं असूनही त्यांना संमेलनाचं साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही. शिवाय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची दखलही घेतली गेली नाही हे साहित्य संवर्धनाच्या दृष्टीनं दुर्दैवच म्हणावं लागेल. 

स्थानिकांचा सहभाग कमी

ग्रंथदिंडी दरम्यान अनेक नागरिकांना हे काय घडत आहे याची कल्पनाही नव्हती. त्यामुळं स्थानिक नागरिकांचा सहभागही या संमेलनात हवा तसा जाणवला नाही. उद्घाटन समारंभाच्या वेळीही स्थानिक गैरहजर होते. संमेलनाचा मंडप फक्त साहित्यिकांनीच भरला होता. साहित्य संमेलन हे लोकांचं संमेलन आहे हे आयोजकांना न उमजल्यामुळंच कदाचित सामान्य जनता संमेलनापासून दूर राहिली असावी.

वातावरणनिर्मिती नाही

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर साहित्यिक या संमेलनात हजर होते. पण दापोलीत या साहित्य संमेलनाबाबतचे फलक क्वचितच दिसत होते. आयोजन समितीअंतर्गत वादाचा फटका संमेलनाच्या प्रचार आणि प्रसाराला बसला असावा, त्यामुळंच साहित्य रसिक संमेलनात सहभागी होऊ शकले नाहीत, असं म्हटलं जातं.

डॉ. आंबेडकरांच्या नावावरून वाद

श्री. ना. पेंडसेनगरीतल्या मुख्य व्यासपीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात येईल, अशी ग्वाही आयोजकांनी दिली होती. पण संमेलनाच्या पूर्वसंध्येला मुख्य व्यासपीठाला साने गुरुजींचं नाव देण्यात आलं. यावरून आंबेडकर अनुयायांनी आक्रमक होत आयोजकांना जाब विचारला असता आयोजकांकडून सारवासारव करण्यात आली. परंतु आयोजकांनी त्यांची माफी मागितल्यावरच हा वाद मिटला.

 


Comments (1)

  • Guest (दीपक भागवत)

    अतिशय यौग्य मुद्याकडे लक्ष वेधलेय. नक्कीच बातमिला न्याय दिलाय!

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.