
श्री. ना. पेंडसेनगरी - जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधीत, वास्तव प्रश्नांबाबत साहित्यिक लिहित बोलत नाहीत, अशी टीका वारंवार होते. दुर्गाबाई भागवतांनी आणिबाणी विरोधात थेट भूमिका घेत या समजाला धक्का दिला होता. तीच परंपरा राखलीय गेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी. “विदेशी कंपन्या इथं येता कामा नयेत. त्यासाठी लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी लेखकांनी आपली लेखणी धारदार केली पाहिजे”, असं आवाहन त्यांनी कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलंय.
दापोलीत आयोजित १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन डहाके यांनी केलं. यावेळी त्यांनी हे विकासाबाबतचं धोरण स्पष्ट केलं. त्याचबरोबर साहित्यिकांचा आणि लेखकांचा दृष्टिकोन याबाबत भाष्य करतानाच भारतात येणाऱ्या विदेशी कंपन्यांना कडाडून विरोध केला. या संमेलनास राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक हजर होते.
विदेशी कंपन्या नकोत
वसंत आबाजी डहाके यांनी उद्घाटनपर केलेल्या भाषणात भारतात येणाऱ्या विदेशी कंपन्यांविरोधी आपली तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या विदेशी कंपन्या इथं येता कामा नयेत. त्यासाठी लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपली लेखणी धारदार केली पाहिजे.”
आपणच विकास साधू शकतो
विकासाबाबतचं धोरण स्पष्ट करताना डहाके पुढे म्हणाले, “आपणच आपला विकास साधू शकतो. इतकी वर्षं आपण दुकानदारी करतोय. मग आपण एवढं करू शकत नाही? करू शकतो. उत्तम प्रकारे माणसांच्या आवश्यक गरजेच्या गोष्टी आपण त्यांना योग्य दरात देऊ शकतो.”
समाज प्रबोधन हवं
विदेशी कंपन्यांच्या धोरणावर टीका करताना त्यांनी एक उदाहरण देत म्हटलं, “एक अमेरिकन कंपनी आहे, जिचा अमेरिकेत मोठा पसारा आहे. या कंपनीबाबत एका दुसऱ्या पाश्चात्त्य लेखिकनं सूक्ष्म रीतीनं अभ्यास करून निष्कर्ष दिलाय की, या कंपनीतर्फे चीनमध्ये ज्या वस्तू तयार केल्या जातात आणि विकल्या जातात. त्या प्रत्येक वस्तूच्या किमतीतून त्या कंपनीत कष्ट करणाऱ्या कामगारांचा एक महिन्याचा पगार दिला जातो.” यासाठी आपल्या लिखाणातून समाज प्रबोधन करावं, असं आवाहन त्यांनी लेखक आणि साहित्यिकांना केलं.
कोकणपट्टीतील साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक, साहित्य रसिक यांच्यासाठी या साहित्य संमेलनात कार्यक्रमांची रेलचेल आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधून संमेलनातील कार्यक्रमांचं आयोजन आयोजकांनी केलं होतं.
Comments
- No comments found