टॉप न्यूज

नायगावकरांच्या भाषणानं संमेलनाचा समारोप

मुश्ताक खान

श्री. ना. पेंडसेनगरी - “राजकारणी साहित्य संमेलनात सहभागी होत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तेही या देशाचे नागरिक आहेत. लोकांचं दु:ख कळण्यासाठी राजकीय व्यक्ती संमेलनात असल्याच पाहिजेत, कारण या व्यक्तीच कायदे बनवतात,” अशी भूमिका व्यक्त केली कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी.

१४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.तीन दिवस चाललेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला.

"मुख्यमंत्री, नगरसेवक लक्षात राहत नाहीत, पण साहित्यिक पिढ्यान् पिढ्या लक्षात राहतात,” अशी प्रतिक्रिया अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी दिली. "साहित्यिक घडवण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

"जगभरात फिरलो, पण कोकणातला निसर्ग सर्वात श्रीमंत आहे,” असंही ते म्हणाले. समारोपाच्या या कार्यक्रमात अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणानं वेगळीच रंगत आणली. त्यापूर्वी साहित्यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या ग्रामीण भागातल्या साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. 

शेवटच्या दिवशी पर्यावरणवाद्यांनी पर्यावरणाच्या रक्षणाची हाक दिली. 'कोकण वाचवा... देश वाचवा' अशी सामूहिक हाकही यावेळी देण्यात आली. तिसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं रंगत आणली ती फय्याज यांच्या प्रकट मुलाखतीनं. राज्यभरातून आलेले साहित्यिक दापोलीत झालेल्या या साहित्य जागरात अक्षरश: डुंबून निघाले. 

तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनात राज्यभरातील लेखक, कवी, समीक्षक आणि साहित्यिकांनी सहभाग घेऊन रंगत आणली. तीन दिवस साहित्याचा आस्वाद घेणारे साहित्य रसिक संमेलनाच्या समारोपावेळी भारावून गेले होते. सर्वांच्या मुखात सौमित्र, नलेश पाटील, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर यांच्या ओळी होत्या. साहित्य संमेलनाचा शेवट केतकी माटेगावकरच्या गायनानं झाला.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.