टॉप न्यूज

दादांनी थोपटले दंड

ब्युरो रिपोर्ट

नागपूर – इथं होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर आज विरोधकांनी मूक मोर्चा काढला. आम्ही एक आहोत, हे दाखवताना आक्रमक होत विरोधकांनी सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरण्याची रणनीती आखलीय. तर अजितदादांनीही दंड थोपटत विरोधकांना सभागृहात उत्तर देईन, असं सांगितलंय. त्यामुळं सलामीपासूनच अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. पण अजित पवार उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांसोबत ते पत्रकार परिषदेसही उपस्थित होते. सिंचनाच्या विषयावर सरकार सभागृहात चर्चेला तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

लक्ष विधेयकांकडे

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना निवडणूक लढवण्याची मुभा, अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक,

भांडवली मूल्यावर मालमत्ता कर, महापालिकेच्या मालकीच्या मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी व पुनर्विकास करण्यासाठी त्यातील रहिवाशांना बाहेर काढण्याचा अधिकार, आदी विधेयकं अधिवेशनात मांडली जाणार आहेत.

50वं अधिवेशन

 1960 साली तत्कालीन मध्य प्रांताचा हिस्सा असलेला विदर्भ महाराष्ट्रात सहभागी झाला. विदर्भासाठी वेगळं राज्य हवं, अशी शिफारस फाजल अली अयोगानं केली होती. मात्र मराठी भाषिक नागरिकांसाठी एक राज्य असावं, असा विचार ठेवून विदर्भातली जनता आनंदानं महाराष्ट्रात सहभागी झाली. विदर्भाच्या विकासाची पुरेशी खबरदारी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून केली जाईल, असं आश्वासन यावेळी देण्यात आलं.

 त्यावेळी करण्यात आलेल्या नागपूर करारानुसार तत्कालीन मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या नागपूरला महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. विदर्भातल्या जनतेच्या प्रश्नाकरता दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचंही बंधनकारक करण्यात आलं. त्यानुसार हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येतं. आता होत असलेलं अधिवेशन 50वं आहे. 1962, 1963, 1979 आणि 1985 या चार वर्षांत नागपुरात एकही अधिवेशन झालं नाही. 1980 तसंच 86 या दोन वर्षांत नागपुरात दोन-दोन अधिवेशनं झाली.  

1994 मध्ये नागपूर अधिवेशनावर धडकलेल्या गोवारी जमातीच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 113 नागरिकांचा बळी गेला होता. 

 

 


Comments (1)

  • Guest (शशि satara)

    गुड इन्फो.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.