टॉप न्यूज

विरोधकांनी कसली कंबर

रणधीर कांबळे

नागपूर - राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नागपुरात सुरू झाल्यानंतर या अधिवेशनात अजित पवार आणि त्यांच्या काळात झालेला सिंचन विभागातील घोटाळा, याच विषयावर विरोधक त्यांना लक्ष्य करणार असं चित्र आहे. पवारही ज्या आग्रहानं मंत्रिमंडळात अधिवेशनापूर्वी आलेत, यावरूनच हे स्पष्ट होतंय की, त्यांनीही याला तोंड देण्याची तयारी केलीय.

 

खरं तर ९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. अजित पवारही पक्षाचे नेते असताना त्यांना टार्गेट केलं गेलं नव्हतं. अगदी राज्यात लोडशेडिंग असताना त्यांना तेवढ्या समर्थपणानं विरोधकांनी कोंडीत पकडल्याचं दिसलं नव्हतं. त्यानंतर त्यांच्या टगेगिरीच्या भाषेबाबतही खास त्यांना लक्ष्य केलं गेलं नव्हतं. तसंच नांदेड इथल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना दटावल्याच्या घटनेनंतरही त्यांच्या विरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या निमित्तानं त्यांना टार्गेट करून सभागृह बंद पाडलं गेलं नव्हतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील, जी विरोधी पक्षांनी छगन भुजबळांना ताकदीनं सभागृहात लक्ष्य केलं होतं. नारायण राणेंना घेरण्यासाठी ताकद पणाला लावली होती, एवढंच नव्हे तर मोठ्या पवारांना राज्यभरात मुंडेंनी कसं सळो की पळो केलं होतं. सभागृहात आणि बाहेर खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष मराठी जनतेला दिसला होता. आता अजित पवार यांना विरोधकांनी लक्ष्य करायचं ठरवलंय तेव्हा तीच एकजूट, तीच ताकद दिसेल का? ...आणि प्रश्न तडीस लागेपर्यंत विरोधक पवारांना घेरतील का, हा खरा प्रश्न आहे. पण खरंच तशी आशा करायला जागा आहे का... तर याचं उत्तर खास करून नाही, असंच द्यावं लागेल, अशी सध्यातरी परिस्थिती दिसतेय.

अजित पवार मंत्रिमंडळात आल्याचं काँग्रेसला रुचलेलं नाही, हे आतापर्यंत स्पष्ट झालंय. त्यामुळंच आता सिंचन घोटाळ्याबाबतची जी काही उत्तरं द्यायची असतील ती एनसीपीनं किंवा अजित पवारांनी द्यावीत, अशीच भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतलीय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी यात बाजू सावरण्याची गरज नाही, असंच काँग्रेसजन सांगताहेत, आता ही भूमिका वटवताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागेल. कदाचित त्यांना अजित पवारांच्या बचावासाठी सरकार म्हणूनही उभं राहावं लागेल.

विरोधी पक्षांनी सिंचन विभागाची काळी पत्रिका प्रसिध्द करून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न तर केला आहे. पण भाजप नेते आणि एनसीपी हे एकमेकांच्या मदतीला धावतात, हा केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांनी जो आरोप केलाय तो आरोप खोटा ठरवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षांना खास करून भाजपला आपली शक्ती पणाला लावावी लागेल. शिवसेनेनं यापूर्वीच अजित पवार यांच्यावर एवढे आरोप असताना ते खुलेआम राज्यात कसे फिरू शकतात, असा सवाल करत त्यांच्या विरोधात रान उठवण्याचा संदेश दिलाय. पण सभागृहात फक्त शिवसेनेनं आक्रमक होऊन चालणार नाही, तर सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन रणनीती बनवावी लागेल आणि शेवटपर्यंत त्या रणनीतीवर कायम राहावं लागेल.

भाजप-शिवसेना-मनसे हे तिन्ही विरोधी पक्ष जर एकजीवानं लढले, तर अजित पवारांना सभागृहात उत्तर देणं कठीण जाईल, यात शंकाच नाही. पण शिवसेना-मनसे मात्र अजूनही सभागृहात एकजीव झालेले कधी दिसले नाहीत, ते दिसतील याबाबतची खात्रीही दिसत नाही. त्याशिवाय सेना-भाजपचा जर इतिहास पाहिला तर एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्ष सातत्यानं करताना दिसताहेत. सुभाष देसाई हे शिवसेनेचे गटप्रमुख झाल्यापासून तर प्रकर्षानं हे दिसू लागलंय. आता तर शिवसेनेनं सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचं ठरवलंय, तसा प्रस्तावही अध्यक्षांकडे त्यांनी दिलाय. मात्र याला भाजपनं समर्थन दिलं नाही. कारण सभागृहात सत्ताधारी पक्षाची संख्या पाहता सरकारच्या विरोधातला हा प्रस्ताव संमत होणं कठीण असताना सरकारला का संधी द्यायची, असा प्रश्न भाजपनं विचारलाय. त्यामुळंच या दोन्ही पक्षांत दुफळी आहे. त्याचा फायदा सत्ताधारी आणि प्रामुख्यानं अजित पवार घेणारच. त्यामुळंच अजित पवार यांना टार्गेट करायचं जरी विरोधी पक्षांनी ठरवलं असलं तरी खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांनी एकजीव असायला हवं.

 


Comments (1)

  • Guest (शशि satara)

    बेस्ट, एनसीपी स्ट्रोंग आहे . एनसीपी आधीच तयारी केलि आहे .शशिकांत शिंदे याना भेट ,रणनीति समजेल .

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.