टॉप न्यूज

सनईवादन पण नाकाने..!

ब्युरो रिपोर्ट

वाशीम - भारतीय शास्त्रीय संगीतात उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईला स्वतंत्र स्थान प्राप्त करुन दिलं. यामुळं या सनईची ओळख जगभरात झाली. परंतु सध्या या सनईच्या आवाजाचा एक वेगळाच सूर आपल्याला वाशीममध्ये ऐकायला मिळेल. वाशीमच्या अनसिंग गावातले संगीत शिक्षक विनोद पोहरे हे सनईचा हुबेहूब आवाज चक्क आपल्या नाकाने काढतात. अगदी अव्वल कानसेनांनाही खरीखुरी सनई वाजतेय की पोहरेंच्या नाकाची सनई वाजतेय हे काही ओळखता येत नाही. 

 सलग अर्धा तास सनईवादन 

विनोद पोहरे यांना लहानपणापासूनच सनई ऐकण्याची आवड होती. त्यामुळं ते सनईवादन शिकले. त्यात प्रवीणही झाले. सनईचे सूर त्यांच्या डोक्यात एवढे भिनले की, त्यांनी नाकातून सनईचे सूर काढायला सुरुवात केली. आता तर ते तब्बल अर्धा तास ही नाकसनाई वाजवतात! या सनईवादनाचे ते जाहीर कार्यक्रमही करतात. त्यांच्या या सनईचे सूर वाशीमसह अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा तसेच नागपूर, मुंबई या बड्या शहरांतही घुमलेत. 

समाजकार्याला मदत 

विशेष म्हणजे पोहरे कार्यक्रमातून मिळालेली रक्कम पेशंट, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना देतात. नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या अनेक कुटुंबांनाही त्यांनी मदतीचा हात दिलाय. त्यांच्या या समाजकार्याची दखल अनेक मान्यवरांनी घेतलीय. यात सुप्रसिध्द गायक अनुप जलोटा, प्रसिध्द मराठी अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता सदाशिव अमरापूरकर, कृषीमंत्री शरद पवार, बबनराव पाचपुते यांचा समावेश आहे. 

व्यवसायाने शिक्षक असलेले पोहरे रिमिक्समध्ये रमणाऱ्या आजच्या पिढीला ही अनोख्या सनईवादनाची कला शिकवतायत. पण अशा या समाजसेवी कलाकाराची दखल अजून सरकार दरबारी घेतली गेलेली नाही. सरकारकडून कलाकारांसाठी मिळणारं मानधनही त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.