टॉप न्यूज

दुसऱ्या दिवशीही आळंदीत गर्दी

ब्युरो रिपोर्ट

आळंदी - कार्तिकी एकादशी व श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 716 वा संजीवन समाधी सोहळा काल सोमवारी आळंदीत पार पडला. यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं अलंकापुरी न्हाऊन निघालीय. आज दुसऱ्या दिवशीही इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी गजबजून गेलाय.

सोमवारी मुख्य सोहळा पार पडला. मध्यरात्री माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक करण्यात आला. समाधीवर चांदीचा मुखवटा चढवला होता. माऊलींवर 21 लिटर दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणं, अत्तर यांचा अभिषेक करून महापूजा बांधण्यात आल्यानंतर दर्शन सुरू झालं. माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी दुपारी एक वाजता निघाली आणि रात्री आठ वाजता तिचा मंदिरात प्रवेश होऊन नंतर जागर झाला. नगर प्रदक्षिणेत मोठ्या उत्साहानं वारकरी सहभागी झाले होते. यावेळी 'माऊली...माऊली'च्या जयघोषानं अवघी अलंकापुरी दुमदुमून निघाली. 

सोमवारी दिवसभर दर्शनाची रांग सुरू होती. दुसरीकडं इंद्रायणीच्या काठावर माऊलींचा जयघोष करत वारकरी भजन, कीर्तनात दंग झाले होते. गर्दीमुळं ज्या भाविकांना सोमवारी दर्शन घेता आलं नाही त्यांनी आज दर्शनासाठी गर्दी केलीय. त्यामुळं आजही दर्शनरांग कायम आहे. तर इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये टाळचिपळ्यांच्या निनादात अभंग, भूपाळी म्हणत वारकरी भगवंतांचं नामस्मरण करताहेत. 

आळंदी नगरपालिकेनं भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची, फिरत्या शौचालयांची व्यवस्थी केली होती. तरीही गर्दीमुळं व्यवस्था अपूर्ण पडत होती. याबद्दल अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त करून कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. 

मुख्य रस्ते बंद

कार्तिकी यात्रेसाठी आळंदी शहरात येणारे मुख्य रस्ते १२ डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यामध्ये पुणे ते आळंदी, चाकण ते आळंदी, वडगाव घेनंद ते आळंदी, मरकळ ते आळंदी या मार्गांचा समावेश आहे. भाविकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.