
सातारा - चारा छावण्यांमधील हिरव्या चाऱ्याची कमतरता, नुसतं उसाचं कांडं खाऊन खाऊन जनावरांचं बिघडलेलं आरोग्य, या व अशा चारा छावण्यांच्या संबंधित प्रश्नांकडं ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलंय. सरकारनं शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करून ते तडीस न्यावेत अशी मागणीही त्यांनी केलीय.
जनावरांसाठी सुरू केलेल्या चारा छावण्यांमधील हिरवा चारा आता पाण्याच्या कमतरतेमुळं संपत आलाय. जनावरांना सकस चारा देणं आवश्यक आहे. ही आवश्यक गरज भागवण्यासाठी काय करता येईल, या प्रश्नावर सातारा इथं नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान मुळीक यांनी आवाज उठवला.
उसाच्या चाऱ्यामुळं जनावरांना आजार
राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. या परिस्थितीत जनावरांचं संगोपन होण्यासाठी आणि त्यांना पोषक चारा मिळण्यासाठी सरकारनं चारा छावण्या सुरू केल्या. या चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी पावसाळ्यात हिरवा चारा देण्यात येत होता. पण पाण्याच्या कमतरतेमुळं जनावरांना पुरवण्यात येणारा हिरवा चारा संपत आलाय आणि या चाऱ्याअभावी जनावरं जगवणं हे चारा छावण्यांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. यावर तोडगा म्हणून या जनावरांना चारा पुरवण्यासाठी उसाच्या कांड्यांचा वापर करण्यात येतो. प्रत्यक्षात उसाची कांडी खाल्ल्यामुळं जनावरांना आजार होऊ लागले आहेत. या आजारामुळं जनावरांची संख्या रोडावू शकते. यामुळं आवश्यक पशुधन कमी होण्याची शक्यता बळावत चाललीय. यासाठी आगामी काळात राज्यातील पशुधनाची संख्या कमी होणार नाही, याची खबरदारी सरकारनं घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.
सरकारच्या चारा छावण्या
सरकारमार्फत सातारा जिल्ह्यात उघडण्यात आलेल्या 90 चारा छावण्यांमध्ये 55 हजार 648 जनावरं आहेत. यामध्ये 49 हजार 243 मोठी जनावरं असून 6 हजार 405 लहान जनावरं आहेत. माण तालुक्यातील 44 छावण्यांमध्ये 25 हजार 565 जनावरं आहेत, तर खटाव तालुक्यात 29 चारा छावण्यांमध्ये 15 हजार 710 जनावरं आहेत. तसंच फलटण तालुक्यात 17 चारा छावण्यांमध्ये 7 हजार 968 जनावरं आहेत. या चारा छावण्यांमधील जनावरांना आता शेतातील उसाच्या कांड्या चारा म्हणून दिल्या जातात. तर अनुदान म्हणून मोठ्या जनावरांसाठी 80 रुपये, तर लहान जनावरांसाठी 40 रुपये दिले जातात.
'हत्ती गवत' या हिरव्या चाऱ्याची लागवड
राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता जनावरांना सकस हिरवा चारा मिळावा यासाठी डोंगराळ प्रदेशात आणि धरणाचं पाणी उपलब्ध असणाऱ्या भागात चाऱ्यासाठी 'हत्ती गवत'सारखा हिरवा चारा निर्माण केला पाहिजे. शिवाय यासाठी साखर कारखान्यांमध्ये निर्माण होणारा मोलायसिस बग्यास याचा वापर केला पाहिजे. याच्यामध्ये काही प्रमाणात मिनरल मिसळल्यास जनावरांना चांगल्या प्रकारचं खाद्य निर्माण होऊ शकतं, याकडंही मुळीक यांनी सरकारचं लक्ष वेधलयं.
Comments
- No comments found