टॉप न्यूज

दादांच्या उपमुख्यमंत्रिपदावर सरकारचं शिक्कामोर्तब

ब्युरो रिपोर्ट

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या आज (मंगळवार) दुसऱ्या दिवशी भाजपचा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकला. मित्रपक्ष शिवसेनेशिवाय एकट्या भाजपनं काढलेल्या या मोर्चाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. राज्याच्या तसंच विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झालेल्या या जंगी मोर्चामुळं अधिवेशनात निदान विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा वाढली आहे.

अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रिपद कायम ठेवण्याची भूमिका सकाळी विधान सभेत घेऊन सरकारनं या वादग्रस्त विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचं कामकाज तर दिवसभरासाठी तहकूब झालं. त्यानंतर सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी, कापूस, धान सोयाबीनला भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि बीपीएलमधील कुटुंबीयांना किमान १२ सिलिंडर देण्यात यावेत, या मागण्यांसाठी भाजपचा भव्य मोर्चा दुपारी विधान भवनावर धडकला. मोर्चासाठी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी नागपूर दणाणून गेलं.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर आणि देवेंद्र फडणवीस आदी नेते मोर्चात सहभागी झाले होते. 

रेशीमबाग इथून निघालेला मोर्चा सी. पी. अॅण्ड बेरार कॉलेज, तुळशीबाग, महाल, टिळक पुतळा, सुभाष रोड, लोखंडी पूल मार्गे आला. गोवारी टीपॉइंटवर झालेल्या जाहीर सभेत नेतेमंडळींनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मोर्चाच्या निमित्तानं गडकरी आणि मुंडे बऱ्याच दिवसांनी एकत्र आले. गोपीनाथ मुंडे यांनी 'उलट्या पायाचं सरकार' अशा शब्दात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. श्वेतपत्रिकेची होळी करा, तसंच येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, सिंचन घोटाळा प्रकरणात तडकाफडकी पदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांची पुन्हा उपमुख्यमंत्रिपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य असल्याचं सांगत विरोधी पक्षांनी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ केला होता. नवीन मंत्री म्हणून पवार यांचा परिचय करून देण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत निर्णय राखून ठेवला, तर विधान परिषद सभापतींनी हरकत फेटाळत कामकाजाला सुरुवात केली. निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला. आज सकाळी विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर पवार यांचं उपमुख्यमंत्रिपद कायम ठेवण्याची भूमिका सरकारनं घेतली. यामुळं 'दादा विरुद्ध बाबा' असं चित्र वरवर दिसत असलं तरी दादांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस एक आल्याचं चित्र आज स्पष्ट झालं.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.