टॉप न्यूज

हे राजकारण कोण पुढं नेणार?

रणधीर कांबळे

मुंबई - साहेबांचा वाढदिवस... एनसीपीच्या कार्यकर्त्यांसाठी काही उपक्रम राबवण्याचा दिवस होऊ लागलाय...

खरं तर पवारसाहेब हे राज्यातले सर्वमान्य नेते. त्यांची दृष्टी ..त्यांचा राज्याचा, लोकांचा, अगदी सामान्य माणसाची जाण असण्याचा आवाका मोठा. असा नेता एखाद्या राज्यात असणं म्हणजे त्या राज्याचं राजकीय शक्तीस्थान बलवान असणं. खरं तर महाराष्ट्रानं मोठे नेते, व्यक्तिमत्व निर्माण करण्याचं काम केलंय. या मातीचाच तो गुणधर्म आहे. पण आता पवारांएवढा नेता तयार होणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे काय, असा प्रश्न पडावा असं नव्या पिढीतल्या नेत्यांच्या एकूणच उंचीकडं पाहिलं की वाटतं... 

हे असं का व्हावं? पवारांच्या वेगवान कारकिर्दीचा आढावा घेतला तरी असं वाटतं की, त्यांच्या असण्यानं राजकारणात खूप काही घडत होतं. पण आता ते थांबल्यासारखं वाटतंय का, असा विचार येतोय.. 

कारण सध्या चर्चा जास्त तात्कालिक प्रश्नांवर होताना दिसतेय. अनेक विधायक, सामाजिक कामं समाजात चालू आहेतच, नाही असं नाही. पण एकूण समाज राजकीय वातावरणानं, लोकांच्या प्रश्नांनी जागता आहे, असं चित्र काही दिसत नाही. त्यामुळं मग वाटतं की, पवारसाहेबांसारखा आवाका का कमी पडतोय नव्या नेतृत्वात? 

1999 साली स्वाभिमानाची ज्योत पेटवत एनसीपीची स्थापना झाली. पवारांच्या नेतृत्वानं भारलेली तरूण पिढी पक्ष गावोगावात पोहोचवायला सरसावली. पण सत्तेतल्या भागीदारीची पाच वर्षे सरल्यानंतर या पक्षात साचलेपण यायला लागला. एक नवी आमदारांची फळी आली पण ती पक्ष वाढवण्यापेक्षा स्वतः कसं वाढता येईल, असा विचार करून पक्षात आली. त्यांच्या मागोमाग त्याच मानसिकतेतून कार्यकर्तेही आले. त्यामुळेच या पक्षाच्या नेत्यांचं नातं सामान्य माणसांशी तुटल्याची भावना वाढू लागलीय. जो वर्ग साहेबांच्या प्रेमाखातर त्यांच्या नेतृत्वाच्या आकर्षणानं आला, त्यात आता फरक झालेला दिसतोय, याचा गांभीर्यानं कुणी विचार करताना सध्या तरी दिसत नाही. अजित पवार यांनी ठाण्यासारख्या शहरात जाहीरपणानं सांगितलं होतं की,'पक्षाच्या नेत्यांच्या बंगल्यात पक्षाची कार्यालयं थाटली जाताहेत, पण पक्षाचं स्वतंत्र कार्यालय मात्र होताना दिसत नाही.' यातच पक्षाची सध्याची स्थिती काय आहे, हे स्पष्ट होतं.

साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या गोष्टींची चर्चा होण्याची गरज कुणाला वाटताना दिसत नाही. त्यापेक्षा साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जाहिराती झळकवणं सोपं वाटतंय. असा शॅार्टकट पब्लिसिटीचा मार्ग चोखाळणारे नेते आणि कार्यकर्ते वाढू लागलेत. खरं तर एखाद्या पक्षात व्हिजन आखूड  असणा-या नेत्यांची संख्या वाढणं, हे राज्याच्या दृष्टीनं धोक्याची सूचना असते. त्याचा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विचार होण्याची गरज आहे.

पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हाच एक विचार समोर येतोय की, राज्यातला शेतकरी अडचणीत आहे, सामान्य माणूस महागाईच्या विळख्यात पिसून निघतोय, अनेक ठिकाणी मसल पॅावर असणारांची संख्या वाढतेय मग त्यात वाळू माफिया असू द्यात किंवा टोलनाक्यातनं अवाढव्य संपत्ती वाढवणारा वर्ग असो, या एकूण स्थितीमध्ये राज्याला दिशा देणारा नेता दिसेनासा होतोय. भावनिक वातावरण तापवणारांची संख्या काही कमी नाही. पण राज्याच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं वाटचाल करणारं नेतृत्व दिसेनासं झालंय. जी अपेक्षा पवार साहेबांकडून होती ती पण आता धूसर होऊ लागल्याचं दिसतंय. पवारांचा दबदबा आहेच, पण त्यांचं संयमी राजकारण चालवणारा नेता काही दिसत नाही. 

पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विचार करताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय ती म्हणजे राज्यातल्या राजकारणात दूरदृष्टीचं सर्वव्यापी नेतृत्व कुठल्याच पक्षात सध्या दिसत नाही. ही धोक्याची सूचना आहे. आणि एक प्रकर्षानं समोर येणारी बाब- पवारसाहेबांसारखा नेता निर्माण होताना दिसत नाही! ही कुणाची जबाबदारी होती? खरं तर ती पवारसाहेबांचीच होती. पण ही जबाबदारी वास्तवात उतरवण्यात पवारसाहेब यशस्वी झाले नाहीत, असंच दिसतंय. स्वत: पवारसाहेब यांचं नेतृत्व निर्माण होण्यामागं त्यांचे कष्ट होतेच, पण यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचे मानसपूत्र होण्याचा मानही त्यांनाच मिळाला, हे त्यामागचं खूप मोठं कारण आहे. पवारसाहेबांनी मात्र यशवंतरावांप्रमाण नवं नेतृत्व उभं केलं, असं म्हणता येणार नाही.

शरद पवारांनी काही ठाम भूमिकांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत दाखवली. त्यासाठी राजकीय नुकसानही सोसलं. नंतर राजकीय लवचिकताही दाखवली. सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी तर त्यांनी सत्ताही पणाला लावली. त्याचा राज्यात एक पायंडा पाडला. पण त्यांच्यासारखी भूमिका घेऊन राजकारण करणारा नेता राज्यात उभा राहिल्याचं दिसेना. तसं झालं असतं तर आज किमान एनसीपीमध्ये तरी तसं नेतृत्व दिसलं असतं. अगदी जेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर जेंव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की, सर्व घटकांना घेऊन राजकारण करणार काय? त्यावर त्यांनी म्हटलं की, 'ते आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही चिंता करू नका!'. यातूनच त्यांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली होती.

आता तर राजू शेट्टी यांनी ऊस आंदोलन केलं तेव्हा, पवारसाहेबांनी शेट्टींची जातच काढली. पवारांच्याही राजकीय विचारसरणीची एवढी घसरण का झाली? याचाही आता विचार करण्याची गरज  आहे. खरं तर पुरोगामी नेता म्हणून ज्यांची प्रतिमा राज्यात होती, त्याच दिशेनं राज्याचं राजकारण चालत होत्ं. पुरोगामी राजकारणाची प्रतिष्ठाही आता कमी होतेय की काय, अशी भिती वाटतेय. फक्त पैसेवाल्यांचं अन् पैसेवाल्या जातींचंच राजकारण अधिक प्रभावी होताना दिसतंय. हे अतिशय गंभीर आहे. ज्याचा विचार पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करायला हवा. खरं तर पुन्हा 12-12-12 होणे नाही, तसंच असा नेताही होणे नाही ...पण त्यांचं राजकारण पुढे नेणारा नेता तयार न होणं हे राज्याला आहे त्यापेक्षाही मागं नेणारं ठरेल...

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.