टॉप न्यूज

भारतरत्न पंडित रविशंकर यांचं निधन

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - भारतीय संगीताची जगाला ओळख करून देणारे विख्यात सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचं अमेरिेकेत निधन झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे सहा वाजता सॅन दियागो शहरात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ते 92 वर्षांचे होते.

त्यांच्या निधनामुळं भारतीय शास्त्रीय संगीताची मोठी हानी झाल्याची भावना संगीत क्षेत्रातून व्यक्त होतेय. 

जगभरात संगीताची मुशाफिरी करणाऱ्या पंडितजींनी पारंपरिक संगीत आणि आधुनिक संगीत यांचा सुरेख मेळ साधून जगासमोर आणलेलं फ्युजन चिरस्मरणीय आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, राष्ट्रपतींनी तीव्र दु:ख व्यक्त केलंय.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. 6 डिसेंबरला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना  सॅन दियागोतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानचं त्याचं निधन झालं. रविशंकर यांचा जन्म 7 एप्रिल १९२० रोजी काशी इथं झाला. अभिजात भारतीय संगीतातील माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य. त्यांचे वडील श्याम शंकर विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. त्यांचं पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेलं. त्यांची आई हेमांगिनी यांनी त्यांचं पालन केलं. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस इथं राहत. १९३० साली रविशंकर आईसोबत पॅरिस इथं गेले. त्यांचं आठ वर्षांचं शालेय शिक्षण तिथंच झालं.

१९३८ साली वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडं शिक्षण सुरू केलं. शिक्षणकाळात उस्ताद साहेबांचे वडील आणि प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी त्यांचा परिचय झाला. १९३९ साली अहमदाबाद शहरात त्यांनी प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच खऱ्या अर्थानं त्यांची सतार वादक म्हणून जगाला ओळख झाली. 

बॅलेसाठी संगीत रचना 

पंडितजींनी बॅलेसाठी संगीत रचना आणि चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केलं. त्याकाळातील 'धरती के लाल', 'नीचा नगर' या गाजलेल्या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं. इक्बाल यांच्या 'सारे जहाँसे अच्छा' या गीतास त्यांनी दिलेलं संगीत अतिशय लोकप्रिय ठरलं. इ.स. १९४९ साली ते दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत 'संगीत दिग्दर्शक' म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ दरम्यान त्यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी, पथेर पांचाली, अपराजित तसंच अपूर संसार या चित्रपटांना संगीत दिलं. यानंतर त्यांनी चापाकोय़ा, चार्ली आणि गांधी (१९८२) या सुप्रसिद्ध चित्रपटांना संगीत दिलं. १९६२ साली त्यांनी किन्नर स्कूल ऑफ म्युझिक,  मुंबई आणि १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, लॉस ॲन्जेलिस यांची स्थापना केली. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप, अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.

भारतरत्न पुरस्कार

त्यांच्या कार्यामुळं अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या पायाशी चालत आले. 1999 रोजी भारत सरकारनं त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.