टॉप न्यूज

शेतकऱ्यानं बनवलं कांदायंत्र

ब्युरो रिपोर्ट

नाशिक

शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य ती किंमत का मिळत नाही, याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतमालाची प्रतवारी नसणं. म्हणजे आकार, दर्जानुसार फळं, भाज्यावगैरेंचं वर्गीकरण करणं. कांदा हा त्यापैकीच एक. त्याला भाव न मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याची प्रतवारी नसणं. कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. प्रत्येक वेळी त्यातील लहान, मध्यम, मोठे कांदे वेगवेगळे काढणं हे जिकिरीचं काम असतं. त्यासाठी मजूरही मिळत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय, नाशिक जिल्ह्यातल्या गणपतराव मवाळ या शेतकऱ्यानं.  गणपतरावांनी कांद्याच्या चाळणीचं बहुउद्देशीय यंत्र बनवलंय. या यंत्रांत केवळ कांदाच नाही तर इतरही फळभाज्यांची वगैरे प्रतवारी करता येते. यामुळं शेतकऱ्यांच्या पैशांची आणि वेळेचीही बचत होणार आहे. शिवाय यात ग्राहकांचाही फायदा होणार आहे. 

2006 पासून मवाळ यांनी हे चाळणीयंत्र तयार करण्यासाठी संशोधन सुरू केलं. सुरूवातीला बांबूचं मशीन बनवून त्यांनी त्याच्या अनेक चाचण्या घेतल्या. अखेर त्यांना मोठं आणि सुलभ यंत्र तयार करण्यात यश आलं. या यंत्रानं कांद्याची मोठा, मध्यम आणि गोल्टी अशी तीन प्रकारची प्रतवारी करता येते.  

या यंत्रात कांदा टाकल्यानंतर त्याच्यातून पालापाचोळा आपोआप वेगळा होतो. सुरूवातीला मोठा कांदा बाहेर पडतो. त्यानंतर मध्यम आणि गोल्टी कांदा बाहेर येतो. त्यामुळं कांद्याची प्रतवारी शेतकऱ्याला घरच्या घरी करता येते. या यंत्रातून एका मिनिटाला एक क्विंटल कांद्याची चाळणी करता येते. याचा शेतकऱ्यांना मोठाच फायदा मिळणार आहे. या यंत्राची कृषी विभागानं दखल घेतली असून शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडं या यंत्राची शिफारस केली आहे.  

या यंत्रात प्लास्टीक आणि लोखंडाचा वापर करण्यात आलाय. या संपूर्ण प्रयोगावर मावळ यांनी आतापर्यंत पंधरा लाखांचा खर्च केला आहे. या चाळणीत बटाटा, लिंबू, बोर, आवळा, संत्री, मोसंबी या फळांचीही प्रतवारी करता येते. गरीब कुटुंबातल्या गणपत मवाळ यांनी आपल्या बुध्दीच्या जोरावर ही बहुउद्देशीय चाळणी तयार केलीय. शेतकऱ्यांच्या अडचणींवर शेतकरीच उपाय शोधू शकतो, याचा प्रत्यय मवाळ यांनी दिलाय. त्यांच्या या यंत्राचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम वाचणार आहेत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.