टॉप न्यूज

'चौसर' जुगार नव्हे, मनोरंजन!

ब्युरो रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट

वाशीम – चौसर हा बंजारा समाजातील लोकांचा अत्यंत आवडीचा एक खेळ. या समाजातील युवक आणि ज्येष्ठ व्यक्ती वयाचं भान विसरून मोठ्या उत्साहात हा खेळ खेळतात. वाशीम जिल्ह्यातील फुल उमरी गावातील बंजारा विशेषतः दिवाळीच्या सुट्टीमध्ये हा खेळ आवर्जून खेळतात.  

बंजारा समाजात चौसर या खेळाला विशेष महत्त्व आहे. बंजाराबहुल भागात आजही मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या काळात चौसर खेळला जातो. हा खेळ खेळण्यापूर्वी या खेळात भाग घेणारे लोक प्रथम सभोवती कडं करून बसतात. या कड्यामध्ये चौसरची मांडणी केली जाते. हा चौसर अधिक चिन्हाच्या आकाराचा असून तो कापडी असतो. या खेळात दान टाकण्यासाठी सोंगट्या म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. यात सहा कवड्या वापरल्या जातात. पूर्वी या खेळात हस्तीदंताचा वापर करून फासे बनवले जात.  एकूण चार-चार किंवा आठ-आठच्या गटानं हे सर्व मोठ्या आवेशानं हा खेळ खेळतात. सोळा साराचा असलेला हा खेळ तासन् तास खेळला जातो.  मात्र या खेळात पराजित झालेल्या संघानं विजयी संघाला दंड म्हणून चहा किवा नास्ता देणं भाग असतं.  

मुळात हा चौसर पांडवांच्या काळापासून खेळला जातो. त्या काळात त्याला द्युतक्रीडा असं म्हटलं जाई. महाभारतकालीन शकुनी मामा व त्याच्या द्युत (चौसर) खेळाच्या माध्यमातून संपूर्ण महाभारताचा युद्धसंग्राम घडला, असं म्हटलं जातं.  

शेतातील काम आटोपल्यानंतर विरंगुळा म्हणून हा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळताना हे बंजारा कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्याच्या उद्देशानं न खेळता केवळ बुद्धीचा विकास व्हावा आणि मानसिक ताण कमी होऊन तरुण पिढीला या खेळाचं महत्त्व पटावं, हा उद्देश हा खेळ खेळण्यामागील असल्याचं सांगतात.

आजच्या हायटेक जमान्यात चौसर टिकवण्यासाठी बंजारा समाजाचा प्रयत्न सुरू आहे. सरकार ज्याप्रमाणं इतर खेळांना प्रोत्साहन देतं त्याचप्रमाणं या खेळालाही सरकारनं सुविधा पुरविल्यास इतिहासप्रसिद्ध असा हा टिकून राहण्यास निश्चितच मदत होईल, असं इथला आदिवासी बांधव आवर्जून सांगतो.  तसंच हा खेळ टिकून राहावा यासाठी या खेळाच्या बंजाराबहुल भागात स्पर्धाही भरवल्या जातात.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.