टॉप न्यूज

सिद्धनाथाचा विवाह थाटात

ब्युरो रिपोर्ट

सातारा - जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवडच्या सिध्दनाथमहाराजांची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेला महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश इथूनही अनेक भाविक येतात. यंदा अंदाजे पाच ते सहा लाख भाविकांनी इथं भेट दिली. ही यात्रा महाराष्ट्रातील प्रसिध्द यात्रांमधील एक यात्रा मानली जाते. माणदेशातील जनतेचं अराध्य दैवत असलेल्या म्हसवडच्या श्रीसिध्दनाथ आणि जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा या यात्रेनिमित्त थाटामाटात साजरा झाला.

प्राचीन मंदिर

माण तालुक्यातील माणगंगा तीरावर इसवी सन दहाव्या शतकात हे हेमाडपंथी मंदिर उभारण्यात आलं होतं. या मंदिरात एक भुयार आहे. या भुयारामध्येच जागृत शिवलिंग आहे. हे भुयार केवळ महाशिवरात्री दिवशीच भक्तांसाठी खुलं केलं जातं. मंदिरातील नंदीशेजारी भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. चालुक्य राजा जयदेव मल्ल यांच्या कालावधीत हा शिलालेख कोरल्याचं यावरील माहितीवरून स्पष्ट होतं.

सोहळ्याची प्रथा

म्हसवड येथील सिध्दनाथ - जोगेश्वरी या दैवतांची घटस्थापना दिवाळी पाडव्याच्या दिवशी केली जाते. तर हळदी सोहळा आणि विवाह सोहळा कार्तिक शुध्द बारसला रात्री 11.30 वाजता होतो. पारंपरिक पध्दतीनं हा धार्मिक सोहळा झाल्यानंतर मंदिर परिसरातच पालखीतून सिध्दनाथाची मिरवणूक काढतात. या सोहळ्याचा मुख्य दिवस म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेस 21 फुटी रथातून ही मिरवणूक सुरू होते. यावेळी या रथामध्ये बसण्याचा मान गुरव समाजाचा असतो, तर या रथाची देखभाल करण्याचा मान राजेमाने घराण्याकडे आहे. शिवाय हा रथ ओढण्याचा मान माळी समाजाला दिला आहे. यावेळी रथाबरोबर चालणारे भाविक मानाच्या सासनकाठ्या हलगीच्या तालावर डोक्यावर नाचवत जातात. यावेळी भाविक रथावर गुलाल, खोबरं उधळत श्रीसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं करतात.

पाण्याची सोय

दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं सरकारनं यावर्षी भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी बारा टँकर मागवले होते. तर दोन वर्षांपूर्वी नदीच्या पुरात दोन युवक वाहून गेल्याच्या घटनेमुळं यावर्षी मिठाई दुकानांसाठी बाजारपेठ मैदानात जागा केली होती.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.