टॉप न्यूज

माधवराव चितळे अध्यक्ष, सहा महिन्यांत अहवाल

ब्युरो रिपोर्ट

नागपूर - अखेर सिंचन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार आहे. त्याबाबतची घोषणा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज केली. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती सहा महिन्यांत आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करणार आहे. 

तसंच एसआयटीतील इतर सदस्य, कार्यकक्षा आदी तपशील 31 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात पार पडल्यानंतर तटकरे यांच्या घोषणेनं कोंडी फुटून कामकाज सुरू होण्याची आशा आता निर्माण झालीय. त्यामुळं 'टार्गेट अजित पवार'वरून ठप्प झालेलं हे अधिवेशन विदर्भातील प्रश्नांवर केंद्रित होईल, असं दिसतंय.  

आज सकाळी सिंचन घोटाळाप्रश्नी सर्व विरोधकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. त्यामुळं या प्रश्नी दुसऱ्या आठवड्यातही विरोधक चौकशीच्या मागणीवरून मागं हटायला तयार नसल्याचं स्पष्ट झालं. खरं पाहता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातलं शीतयुध्द या सिंचन घोटाळ्याच्या निमित्तानं अधिक उघड झालंय. सत्तर हजार कोटी खर्च करूनही फक्त शून्य पॉइंट एक टक्का सिंचन झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजीचे सूर काढून, या विषयाला हात घातला होता. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सिंचनाची सत्यपत्रिका काढून आणखीनंच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. या सत्यपत्रिकेत सिंचन श्वेतपत्रिकेच्याच काही मुद्द्यांच्या विरोधात मुद्दे मांडलेत. त्यामुळंच ही सत्यपत्रिका अजितदादांची प्रतिमा सुधारण्यास हातभार लावण्याऐवजी तोट्याची ठरलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसनं एक नव्यानंच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय की, सिंचनाचं क्षेत्र ०.१ एवढं जे दिसतंय ते खरं तर प्रिंटिंग मिस्टेक होती. यामुळं राष्ट्रवादीनं विरोधकांच्या हातात कोलीत देण्याचाच प्रयत्न आता केलाय. राष्ट्रवादीच्या या दाव्याच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दंड थोपटलेत. गेल्या १३ वर्षांपासून अर्थ व नियोजन खातं जर राष्ट्रवादीकडं आहे, तर एवढ्या वर्षांत ही प्रिंटिंग मिस्टेक समजली का नाही, असा सवाल विखेंनी केलाय. त्याशिवाय ०.१ सिंचन झाल्याच्या आपल्या दाव्यावरही ते ठाम आहेत. यातून हेच स्पष्ट होतंय की, काँग्रेस हा विषय सहजासहजी सोडू इच्छित नाही. त्यामुळंच विरोधकांबरोबरच काँग्रेसच्याही विरोधाला राष्ट्रवादीला उत्तर द्यावं लागणार आहे. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय.

या सर्व गोंधळात विदर्भातील जनता अस्वस्थ झालीय. आमच्या प्रश्नांवर चर्चा करून ते मार्गी लावा,  अशी त्यांची मागणी आहे. एसआयटीच्या घोषणेनंतर त्यांची ही मागणी बहुधा आता फलद्रुप होईल, असं दिसतंय.  

खाती काढून घ्या - भाजपची मागणी

चौकशी समितीतील  सदस्यांची तातडीनं घोषणा करा, चौकशीच्या कक्षेत जे मंत्री येतील त्यांची खाती काढून घ्या, त्यांना बिनखात्याचे मंत्री बनवा, अशी मागणी भाजपनं आता केलीय. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.