टॉप न्यूज

लहान जलतरणपटूंचा विक्रम

ब्युरो रिपोर्ट

सातारा - "नावात काय आहे," असं शेक्सपिअर म्हणाला होता, पण आकड्यातही मजा असते, असंही काहींचं मत आहे. कारण गाड्यांना ठराविक नंबर आवर्जून घेणारे आहेत. त्याचबरोबर अनेक जण अंकशास्त्रानुसार स्वतःच्या नावातही बदल करून घेत असतात. एकूणच या आकड्यांच्या खेळात सर्व दंग असतानाच साताऱ्याच्या 12 लिटिल चॅम्पनी या शतकातील 12.12.12चा मुहूर्त साधत मोहाट पूल ते वाघेश्वर असं 12 किमी अंतर चार तासात पोहून एक अनोखा विक्रम करत हा दिवस साजरा केला. सोबत हा आगळावेगळा विक्रम साजरा करण्यासाठी 12 युवती, 12 युवक आणि 12 प्रौढ जलतरणपटूही सहभागी झाले होते.

लिटिल चॅम्प्सनं 12.12.12 या दिवसाच्या मुहूर्त साधण्यासाठी साताऱ्यातील कण्हेर धरणाची निवड केली होती. मेढा मोहाट पूल ते वाघेश्वर असं हे 12 किमी अंतर या सर्वांनी सकाळी 10 वाजून10 मिनिटांनी पोहण्यास सुरुवात केली आणि दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी त्यांनी ते यशस्वीपणं पूर्ण केलं.   केंद्रीय कृषिमंत्री नामदार शरद पवार यांचा वाढदिवस आणि राज्य क्रीडा सप्ताहाचं औचित्य साधत या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

या स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गिनिज बुकमध्ये नोंद झालेल्या जलतरणपटू स्नेहल कदम आणि सतीश कदम यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. गेटवे ऑफ इंडिया येथील खाडी या पिता-पुत्रीनं सहा वेळा पार केली आहे. याशिवाय त्यांनी इंग्लिश खाडीही यशस्वीपणे पार केली आहे. स्पेन टू जिब्राल्टर ही खाडीसुद्धा पार करण्यात त्यांना यश मिळालं आहे. अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणं कामगिरी करणारी स्नेहल कदम साताऱ्याचीच असल्यानं हा सुवर्णमध्य साधत साताऱ्यातील इतर जलतरणपटूंच्या साथीत तिनं या आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद केली. “शहरात खेळांचा विकास ज्या तऱ्हेनं होतो, त्याचप्रमाणं ग्रामीण भागातही क्रीडा प्रकारांचा विकास व्हावा हा हेतू या विक्रमाद्वारे साधण्याचा प्रयत्न होता,” अशी प्रतिक्रिया स्नेहल कदम हिनं स्पर्धेनंतर दिली.

यात भाग घेणाऱ्या मुलांमध्ये शहरातील स्वीमिंग पूलमध्ये पोहणाऱ्या मुलांबरोबरच गावातील नदीत डुबक्या मारणारी पोरंही होती. या सर्वांनी साताऱ्याच्या कण्हेर धरणामध्ये पोहून 12.12.12 च्या मुहूर्तावर विक्रम करून अनोखा आनंद मिळवला. पोहण्यामध्ये अनेक विक्रम करता येतात, पण शतकातून येणाऱ्या या एकमेव मुहूर्तावर विक्रम करून साताऱ्यातील जलतरणपटूंनी अविस्मरणीय अशी छाप सोडली आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.