टॉप न्यूज

शिक्षकानं लिहिलं संविधान!

ब्युरो रिपोर्ट

वर्धा -  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महत्कार्याची अर्थात संविधान लेखनाची जाणीव सर्वांना व्हावी आणि भारताचं हे संविधान आपल्या मातृभाषेत लोकांना समजावं, या उद्देशानं वर्ध्यातील धनंजय नाखले यांनी संविधान स्वतः लिहून काढलंय.

धनंजय बाबुराव नाखले हे पेशानं संगीत शिक्षक आहेत.  हे हस्तलिखित संविधान एकूण साडेचारशे पानांचं आहे. ही साडेचारशे पानं त्यांनी दिवस व रात्र अशी चार-चार तास तर कधी पंचवीस तास बसून लिहून काढली आहेत. हे संपूर्ण संविधान लिहायला नाखले यांना पाच महिने पंचवीस दिवस लागलेत. यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले आहेत. त्यांनी हे संविधान लिहिण्यासाठी कटनिप हे पेन वापरलंय, तर यासाठी लागणारी शाई स्वतः तयार केलीय. सुवाच्य अक्षरात लिहिलेलं हे संविधान उत्तम झालंय.

भारताचं संविधान जगातील सर्वात मोठं, सुस्पष्ट आणि जगात मानाचं असणारं संविधान आहे. भारताला अखंड ठेवण्याचं काम ज्या संविधानानं केलंय त्या संविधानाचाच विसर भारतीयांना पडत चाललाय. यालाच उजळणी देण्यासाठी नाखले यांनी हे हस्तलिखित संविधान लिहिलंय. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द आणि घरच्यांच्या सहकार्यांनं हे त्यांना शक्य झालं,  असं नाखले यांनी सांगितलं.

धनंजय बाबुराव नाखले यांना याबाबत सविस्तर विचारलं असता ते म्हणाले, “हे संपूर्ण संविधान इंग्रजीत होतं. मी वाचलं तेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेले काही शब्द कळले नाहीत. ते काम पाहून मी प्रथम भांबावूनच गेलो होतो. तरी आपण प्रयत्न करायचाच हा निश्चय केला. मग मी माझ्या मातृभाषेत मराठीत उपलब्ध असलेलं संविधान वाचलं. माझं मातृभाषेवर प्रेम. यातलंही प्रथम मला काही समजलं तर काही समजलं नव्हतं. पुढं एक पान... दोन पानं... अशी पंचवीस पानं लिहीत गेलो. ...आणि लिंक लागत गेली. पुढं हे संविधान मी पाच महिने पंचवीस दिवसांत पूर्ण केलं.” हे लिहिण्यामागचा दृष्टिकोन काय, असं नाखले यांना विचारलं असता, ते म्हणाले, “बऱ्याच जणांना आपलं संविधान माहीतच नाहीये. सर्वांना त्यांच्या मातृभाषेत ते कळावं यासाठी हे 'हस्तलिखित संविधान' पुस्तकरूपानं प्रकाशित करून नो लॉस नो प्रॉफिट या तत्त्वावर संपूर्ण महाराष्ट्रात वितरित करण्याचा माझा मानस आहे.”

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.