
सातारा - कमांडो म्हणजे कुठलंही संकट छातीवर झेलणारे, तळहाती शीर घेऊन लढायला सदैव 'तैय्यार' असणारे जवान. 26/11चा हल्ला अशाच कमांडोंनी परतवून लावला होता. असे कमांडो तयार होतात, अत्यंत खडतर प्रशिक्षणातून. आता त्यांच्या या प्रशिक्षणात मराठमोळ्या मल्लखांबाचा समावेश करण्यात आलाय. आणि ते प्रशिक्षण त्यांना देतायत सातारचे एक मराठी प्रशिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी...
त्यांचं नाव सुजीत शेडगे. ते आहेत, सातारा जिल्हा मल्लखांब संघटनेचे संस्थापक. त्यांनी आत्तापर्यंत साताऱ्यातल्या अनेक युवकांना मल्लखांब शिकवून चपळ आणि कणखर बनवलंय. त्यांची कीर्ती पोहोचली भारतीय लष्करात कमांडोंना प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत. या अधिकाऱ्यांनी लगेचच शेडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बंगळूरुला बोलावून कमांडोंना ट्रेनिंग देण्याची विनंती केली. शेडगे आणि विद्यार्थ्यांनी स्पेशल फोर्सच्या 25 कमांडोंना 10 दिवसांचं मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं. शिवरायांच्या मावळ्यांच्या अंगातली लवचिकता या कमांडोंच्या अंगात भिनवली.
शेडगे यांनी यापूर्वी सीआयएसएफलाही मल्लखांबाचं शिक्षण दिलेलं आहे. याबाबत शेडगेंना विचारलं असता ते 'भारत4इंडियाशी' बोलताना म्हणाले, “बंगलोर इथं स्पेशल फोर्सच्या 25 कमांडोंना प्रशिक्षण देताना आम्हाला कुठलीच अडचण जाणवली नाही. महत्त्वाचं म्हणजे आमच्या सोबत महाराष्ट्रीयन अधिकारी असल्यामुळं सर्व गोष्टी सुनियोजितरीत्या पार पडल्या. यापूर्वी आम्ही सीआयएसएफच्या युवकांना प्रशिक्षण दिलं होतं. त्यातील युवकांचं वय 20 ते 26 वर्षं असतं. पण सेकंड पॅरा स्पेशल फोर्समधील कमांडोंचं वय 30 च्या आसपास होतं. हे दहा दिवसांचं प्रशिक्षण त्यांनी यशस्वीपणं आत्मसात तर केलंच, शिवाय त्यांनी इतर कसरतीही उत्तम करून दाखवल्या.”
देशात उसळणाऱ्या दंगली, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कमांडोंमध्ये चपळता हवी, ही चपळता मल्लखांबाचं खास प्रशिक्षण घेतल्यावर प्राप्त होऊ शकते हे स्पेशल फोर्समधील उच्च अधिकाऱ्यांनी ओळखलं आणि आपल्या अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केलं. देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिला गेलेला दिवस म्हणजे 16 डिसेंबर 1971. या दिवशी भारतीय सैन्यानं 92 हजार पाकिस्तानी सैनिकांना सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडून पाकिस्तानाच्या जोखडातून बांगलादेशाला मुक्त केलं. तो दिवस विजय दिन म्हणून साजरा होतो. या युध्दात तळहातावर प्राण घेऊन लढलेल्या सैनिकांनी सेकंड पॅरा माजी सैनिक ऑल इंडिया ग्रुप ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्यावतीनं विजय दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी स्पेशल फोर्सचे कॅप्टन सतीश ठोंबरे यांनी या प्रशिक्षणाबाबत आणि प्रशिक्षण देणाऱ्या युवकांबाबत गौरवोद्गार काढले.
Comments
- No comments found