टॉप न्यूज

आधार योजनेचा उडाला फज्जा

ब्युरो रिपोर्ट

वाशीम - सरकारनं गाजावाजा करत सुरू केलेल्या आधारकार्ड योजनेचा वाशीममध्ये कंत्राटदारांनी चांगलाच फज्जा उडवला आहे. नाव नोंदवण्यापासून ते नोंदणी होईपर्यंत रांगेत तिष्ठत उभं राहिल्यानं नागरिकांची दमछाक झालीय. शिवाय अनेक वेळा हे आधारकार्ड नोंदणी केंद्रच बंद असल्यानं पायपीट करून आलेल्या अनेकांना निराश होऊन परतावं लागतंय. आता हे आधारकार्ड म्हणजे नागरिकांचा आधार होण्यापूर्वीच त्यांची डोकेदुखी बनलंय. 

सकाळी सहा वाजल्यापासून नागरिक आधारकार्ड नोंदणीसाठी रांगेत ताटकळत उभे असतात. परंतु कंत्राटदार मात्र आपल्याला हवं तेव्हा केंद्र उघडतात. त्यामुळे तब्बल चार ते सहा तास लोकांना केंद्र उघडण्याची वाट पाहत रांगेत उभं राहावं लागतंय. या कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराला नागरिक त्रासले आहेत. एवढंच नाही तर आधारकार्ड नोंदणीकरता नोंदणी संख्येचं कोणतंही बंधन नसताना इथं दिवसभरात फक्त ४० अर्जच वाटले जातात. त्यामुळं दूरवरून आलेल्या नागरिकांना अर्ज न मिळाल्यामुळं निराश होऊन परतावं लागत आहे. शिवाय अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जोडलेली असतानाही विनाकारण कंत्राटदाराकडून अॅफिडेविटची  मागणी करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये या योजनेबाबतच साशंकता पसरून असंतोष व्यक्त होत आहे. 

या प्रकरणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. यातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सरकारतर्फे आधारकार्डाबाबत जो टोल फ्री क्रमांक (१८००१८०१९४७) दिला आहे, तो क्रमांकही अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळं आधारकार्डाबाबत पूरक माहिती न मिळाल्यानं जनतेची दिशाभूल होत आहे. 

एकीकडे शासकीय योजना मिळवण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. त्यासाठी नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना या आधारकार्ड नोंदणीच्या प्रक्रियेत खंड पडण्यास प्रशासन आणि कंत्राटदार यांचं साटलोटं असल्याचं आता नागरिकांना वाटतंय. त्यामुळं याविरुद्ध विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. जर सरकारी पातळीवरच याबाबत उदासीनता असेल तर या योजनेचा लोकांना लाभ कसा मिळायचा, हा प्रश्न विचारला जातोय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.