
रत्नागिरी - ब्रह्मदेशाचा (सध्याचं म्यानमार) लोककल्याणकारी राजा थिबा याच्या समाधी स्थळी भेट देऊन त्याला अभिवादन करण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आज रत्नागिरात येत आहेत. त्या निमित्तानं आता या राजाच्या वंशजांची आठवण आता सरकारला झालीय. राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची परवानगी या वंशजांना मिळालीय. पण, यामुळं त्यांच्या हलाखीच्या आयुष्यात काही फरक पडणार का, हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ब्रह्मदेशाचा राजा थिबा रत्नागिरीत नजरकैदेत असतानाही ब्रिटिश सरकारनं त्याचा यथोचित सन्मान राखला. त्याला आवश्यक सोयीसुविधाही पुरवल्या. यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणं राजवाडाही बांधून दिला. पण स्वतंत्र भारतात मात्र राजाच्या वंशजांना हलाखीचे दिवस काढावे लागले. थिबाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना ब्रिटिश सरकारनं ब्रह्मदेशात परत पाठवलं. पण राजकन्या फाया हिचं राजवाड्यातच काम करणाऱ्या गोपाळ सावंतबरोबर प्रेम जुळल्यामुळं ती पुन्हा भारतात आली. गोपाळ सावंत आणि राजकन्या फायाची एकमेव मुलगी म्हणजे टुटू. पुढं टुटू हिचं शंकरराव पवारांशी लग्न झालं. ...आणि खऱ्या अर्थानं तिनं भारतातच आपला संसार सुरू केला. टुटू यांना पाच मुलगे आणि दोन मुली झाल्या. या मुलांपैकी प्रमिला भोसले, दिगंबर पवार आणि सुरेश पवार यांचा मृत्यू झाला आहे, यापैकी चंद्रकांत पवार, नारायण पवार आणि सुनंदा मोरे रत्नागिरीतच राहतात. तर श्रीकांत पवार हे कुटुंबीयांसोबत मुंबईत वास्तव्यास आहेत. दैनंदिन जीवनात मात्र राजघराण्याच्या या कुटुंबीयाला अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय.
टुटू यांचे चार नंबरचे पुत्र चंद्रकांत पवार रत्नागिरीतील एमआयडीसी विभागात राहतात. तिथे त्यांचा सर्व्हिसिंगचा व्यवसाय आहे. पण आज त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. चंद्रकांत पवार यांना याबाबत छेडलं असता, भूतकाळात जाऊन आपल्या लहानपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला... "आमची आता परिस्थिती खूपच चांगली आहे. पण माझ्या आईनं मात्र अपार कष्ट उपसले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तिला हमालीही करावी लागली. आम्हीही तिच्याबरोबर हमाली करायचो. टुटूनं बकऱ्या पाळल्या, गुरं पाळली. शिवाय शेणाच्या गोवऱ्या थापून विकल्या. एवढंच नाही तर ज्या घरात टुटू १०० वर्षं (दोन आणे भाडं देऊन) राहत होती, त्या घरातूनही तिला बाहेर काढण्यात आलं.” या कटू आठवणी चंद्रकांत पवार यांच्या हृदयावर आघात करतात. ब्रह्मदेशाच्या राजकन्येला, टुटूला शेवटच्या वेळीही कोणी विचारलं नाही. तिच्या निधनाचीही साधी दखल घेतली नाही.
फाया यांच्या अस्थी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात होत्या. पण आता त्या कुठे आहेत याबद्दल नेमकी माहिती कुणालाही नाही. अस्थींचं विसर्जन करा किंवा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करणारं पत्र ब्रह्मदेश सरकारनं शासनाला पाठवलं होतं. पण त्यांना काय उत्तर देण्यात आलं याबद्दलही माहिती देण्यास कुणी तयार नाहीये, अशी माहिती याच घराण्यातल्या एका व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
थिबा राजा आणि त्याच्या राणीच्या समाधी स्थळाचीही दुरवस्था होती. प्रशासनाचं तर दुर्लक्षच होतं. 'मी हमाली करून या समाधी स्थळाची निगा राखीन,' असं पत्र चंद्रकांत पवार यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी, शरद पवार आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. पण त्यांच्या या पत्राचीही कोणी दखल घेतली नाही. सरकारी पातळीवर एवढी उदासीनता का, राजघराण्याबाबत ही अवस्था तर सर्वसामान्यांची काय कथा, असा सवालही आता विचारला जातोय.