टॉप न्यूज

बोचऱ्या थंडीत धान कापणी

ब्युरो रिपोर्ट

पुणे - सध्याच्या बोचऱ्या थंडीत राज्यभरातील शेतकऱ्यांची धान काढण्याची लगबग सुरू झालीय. तांबड फुटताना बळीराजा शेतात हजर होतोय. हुडहुडी भरवणारी थंडी बाजूला सारत धान कापणी करताना मोत्याची रास आता घरी येणार, याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. कोकणासह, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात, भीमाशंकरसारख्या खोऱ्यात, एवढंच कशाला पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यात; तसंच विदर्भातही काही ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतंय.

पुणे जिल्ह्यातील एकूण ५९,९०० हेक्टरवरील धानक्षेत्र काढणीसाठी तयार झालंय. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेळे, भोर, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी काही प्रमाणात हवामानानं साथ दिल्यानं धान उतारा चांगला आलाय. 

आदिवासी खोऱ्यात लगबग 

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची धान काढण्याची आणि ती झोडण्याची कामं सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात पेरणीवेळी जरी पावसानं ओढ दिली, तरी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करून लागवडी उरकल्या होत्या. सुदैवानं त्यानंतर तुलनेन पाऊस चांगला झाला. त्यामुळं धान चांगलं आलंय.

धानशेती हेच या भागातल्या शेतकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आहे. मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळं जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांची धान शेती संकटात सापडली होती. वर्षभर काबाडकष्ट करून केली जाणारी धान शेती बदलत्या निसर्गचक्रामुळे उद्ध्वस्त होते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. भात लोंबी बाहेर पडण्याच्या ऐन वेळेसच करपा रोगाची लागण झाली होती. यातून बाहेर पडून हळव्या जातीची धान शेती तयार होऊ लागताच काही ठिकाणी परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावत काढणीस आलेल्या हळव्या जातीच्या धान शेतीचं नुकसान या वर्षीही काही प्रमाणात झालं. मात्र वेळोवेळी यावर धान उत्पादक शेतकऱ्यांनी मात करीत धान उत्पादनही वाढवलं आहे. 

पुणे जिल्ह्यातील लागवड 

आंबेगाव तालुक्यात ४८०० हेक्टरवर, जुन्नर ९३०० हेक्टर, मावळ ९७०० हेक्टर, भोर ७५०० हेक्टर, वेल्हा ६००० हेक्टर, हवेली २८०० हेक्टर, खेड ६७०० हेक्टर, मुळशी १५,७०० हेक्टर, तर पुरंदर तालुक्यात १३०० हेक्टर क्षेत्रावर या वर्षी धान लागवड झालीय. लागवडीपासून काढणीपर्यंत पावसानं चांगली साथ दिली. त्यामुळं धान उत्पादन चांगलं होत असल्याची माहिती आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.