टॉप न्यूज

राज्यभरातून बाराशे पहिलवानांची हजेरी

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया - महाराष्ट्रातला दुर्गम, उपेक्षित जिल्हा आणि नक्षलवाद्यांचा परिसर, अशी ओळख असलेल्या गोंदियात सध्या नामवंत मल्लांची खडाखडी ऐकू येतेय. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विदर्भाच्या मातीत खेळवली जातेय. गोंदियातल्या इंदिरा गांधी स्टेडियमला त्याचा मान मिळालाय. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल पटेल यांनी या स्पर्धेचं उदघाटन केलं. या आखाड्यात राज्यभरातले तब्बल बाराशे मल्ल उतरलेत.

या स्पर्धेचं आयोजन गोंदिया जिल्हा कुस्तीगीर संघ आणि मनोहरभाई पटेल अॅकॅडमी गोंदियातर्फे करण्यात आलंय. उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि ऑलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे उपस्थित होते. गोंदियाचे दिवंगत पहिलवान कुंदलालजी यादव आणि मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून स्पर्धेचं उदघाटन झालं. 

गोंदियामध्ये २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होत आहे. या कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत कौतुकोद्गार काढले. प्रफुल पटेल म्हणाले, "मागील वर्षी भंडारा जिल्ह्यात विदर्भस्तरीय कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रात ही स्पर्धा ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, तशीच ती विदर्भातही घेण्यात यावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना या वर्षी यश आलं आहे.”  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोंदियाच्या विकासात अडथळा आणत होते. पण प्रफुल पटेल यांनी आपली राजकीय ताकद लावून चार महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये गोंदियामध्ये सरकारी मेडिकल कॉलेजला परवानगी मिळवून दिलीय; तसंच क्रीडाप्रेमींसाठी क्रीडासंकुलाचीही निर्मिती होत असल्याचं या कार्यक्रमाच्या वेळी गोंदियाचे आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितलं. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.