टॉप न्यूज

अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचं अपघाती निधन

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्यासह अक्षय पेंडसे आणि पेंडसे यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष मृत्युमुखी पडले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बऊर गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली. यामुळं संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 चित्रीकरण आटोपून अभ्यंकर आणि पेंडसे हे मोटारीनं मुंबईकडं येत होते. बऊर गावानजीक पुण्याला जाणारा टेम्पो रस्ता दुभाजक तोडून त्यांच्या मोटारीवर आदळला. यात अभ्यंकर, पेंडसे व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले, तर पेंडसे यांची पत्नी दीप्ती व मोटारचालक किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, अभ्यंकर, पेंडसे व प्रत्युष पेंडसे या तिघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अभ्यंकर यांच्या डोक्याला व छातीला गंभीर जखमा होत्या, तर पेंडसे यांना अनेक ठिकाणी जखमा होऊन, त्यांचा उजवा हातच तुटला होता. तसंच प्रत्युष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. 

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठाच्या आवारात आगामी 'कोकणस्थ' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. रविवारी ते संपवून रात्री नऊच्या सुमारास सर्व जण कोथरूड येथील घरी गेले. तिथून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पुण्यात असलेले कलाकार जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, सुधीर गाडगीळ, हर्षदा खानविलकर, प्रवीण तरडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल; तसंच पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया यांनी रुग्णालयात धाव घेतली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तिघांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी चित्रपट क्षेत्रासह विविध मान्यवर उपस्थित होते.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.