टॉप न्यूज

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादवचा पराक्रम

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया - विदर्भाच्या मातीत चार दिवसांपासून रंगलेल्या कुस्तीच्या फडात गतविजेत्या मुंबई उपनगरच्या नरसिंग यादवनं प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र केसरी' किताब लागोपाठ दुसऱ्यांदा पटकावला. एकतर्फी अंतिम सामन्यात मुंबईच्या या पठ्ठ्यानं खान्देशच्या विजय चौधरीला अवघ्या तीन मिनिटांत अस्मान दाखवलं.

 घापताप डाव

गोंदिया जिल्हा कुस्तीगीर संघ आणि मनोहरभाई पटेल अकादमीतर्फे 21 ते 24 डिसेंबर दरम्यान गोंदियात  इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 56वी राज्य कुस्ती स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यात राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेत्या नरसिंगनं माती विभागातील विजेत्या चौधरीला दुसऱ्याच फेरीत चीतपट केलं. दोन मिनिटांची पहिली फेरी जिंकून चौधरीनं खळबळ उडवून दिली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत त्यानं चौधरीला 'घापताप' डावावर मॅटवर लोळवलं. त्यानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. ढोलताशांच्या गजरात फटाक्‍यांची आतषबाजी झाली. विजेत्या नरसिंगला 'कुस्ती महर्षी' मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र माजी खासदार अशोक मोहोळ यांच्यातर्फे प्रायोजित दीड किलो वजनाची चांदीची गदा आणि तीन लाखांचा धनादेश देण्यात आला.

कोल्हापूरची तांबडी माती...

स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला सांघिक विजेतेपदाचा बहुमान मिळाला. शेवटच्या दिवशी माती विभागात पुणे जिल्ह्याच्या राहुल खानेकरनं 84 किलो वजनगटात, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या कौतुक डाफळेनं 96 किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकलं. गादी विभागात जळगावच्या अतुल पाटीलनं 84 किलो वजनगटात, तर 'रुस्तुम-ए-हिंद' हरिश्‍चंद्र बिराजदार यांचा मुलगा पुणे शहरचा सागर बिराजदार यानं 96 किलो वजनगटात बाजी मारली. 

मान्यवरांची उपस्थिती 

 पुरस्कार वितरण समारंभाला 'रुस्तुम-ए-हिंद' दादू चौगुले, आमदार राजेंद्र जैन, अशोक मोहोळ, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, राज्य कुस्तीगीर परिषदेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, माजी आमदार ज्ञानोबा लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, ऑलिंपियन मारुती आडकर, 'रुस्तुम-ए-हिंद' अमोल बुचडे, सर्जेराव शिंदे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिहरभाई पटेल, सचिव पंकज यादव, नगर परिषदेचे उपाध्यक्ष लोकेश यादव, गणेश कोहळे, सीताराम भोतमांगे उपस्थित होते. इतरही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

प्रमुख निकाल

गादी विभाग - 84 किलो : (अंतिम फेरी) अतुल पाटील (जळगाव) वि. वि. सरदार सावंत (कोल्हापूर जिल्हा), शैलेश शेळके (लातूर) वि. वि. सुनील शेवतकर (सोलापूर जिल्हा). 96 किलो : (अंतिम फेरी) : सागर बिराजदार (पुणे शहर) वि. वि. अक्षय शिंदे (बीड जिल्हा), तृतीय स्थान : गुलाम आगरकर (अहमदनगर) मात समीर देसाई (कोल्हापूर जिल्हा)

माती विभाग- 84 किलो : (अंतिम फेरी) : राहुल खानेकर (पुणे जिल्हा) वि. वि. आप्पा सरगर (मुंबई शहर), तृतीय स्थान : संतोष लवटे (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. सोमनाथ राऊत (अहमदनगर), (उपांत्य फेरी) : राहुल खानेकर (पुणे जिल्हा) वि. वि. आप्पा सरगर (मुंबई शहर), संतोष लवटे (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. सोमनाथ राऊत (अहमदनगर)

96 किलो (अंतिम फेरी) : कौतुक डाफळे (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. संतोष दोरवड (सोलापूर जिल्हा), तृतीय स्थान : सचिन जामदार (कोल्हापूर शहर) वि. वि. अमित पाटील (मुंबई पूर्व उपनगर), (उपांत्य फेरी) : कौतुक डाफळे (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. सचिन जामदार (कोल्हापूर शहर), संतोष दोरवड (सोलापूर जिल्हा) वि. वि. अमित पाटील (मुंबई पूर्व उपनगर)


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.