
पुणे - कांद्याचे बाजारभाव कोसळत असल्यानं राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांना गरज आहे ती यातून मार्ग शोधण्याची. हा मार्ग पुणे-फुरसुंगी जातीच्या कांदा लागवडीतून मिळतोय, हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या मेंगडेवाडीतील साहेबराव मेंगडे यांनी केलेल्या लागवडीतून स्पष्ट झालंय. या कांद्याची साठवण क्षमता अधिक असल्यानं हा कांदा योग्य वेळी बाजारात नेता येतो; तसंच या जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेता बीजोत्पादनातून फायदाही मिळू शकतो. असं हे दुहेरी फायद्याचं तंत्र आहे. मेंगडे यांनी यातून तब्बल १८ लाखांची कमाई केली.
उच्च शिक्षण घेतलं की कुठेतरी गलेलठ्ठ पगाराची नोकरी करायची, हा ग्रामीण भागातल्या युवकांचा उद्देश असतो. मग घरची वडिलोपार्जित शेती मागे उजाड बनते. एम.एस्सी. अॅग्री झालेले साहेबराव मेंगडे हे गोदरेज कंपनीत शेती विभागात मार्केटिंग व्यवस्थापक पदावर काम करीत होते. लातूर, मराठवाडासारख्या विभागात काम करताना शेतीमालाचं उत्पन्न कसं फायदेशीर ठरू शकतं याचा अनुभव आल्यानंतर त्यांनी घरची शेती करायचा निर्णय घेतला. आंबेगाव तालुक्यातल्या मेंगडेवाडीतील वडिलोपार्जित केवळ सहा एकर जमिनीत परंपरागत पिकं घेऊन कुटुंबाची गुजराण होत होती. मात्र, शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेल्या साहेबरावांनी सुरुवातीला लाखनगाव इथं पाच एकर जमीन खंडानं घेऊन ऊसशेती केली. त्यात त्यांना यश आल्यानंतर अशाच प्रकारे ठिकठिकाणी खंडानं शेती घेऊन त्यात वेगवेगळी पिकं घेण्यास सुरुवात केली.
मागील वर्षी पुणे-नाशिक महामार्गावरच्या शेवाळवाडी गावच्या डोंगरउतारावर १० एकर शेती त्यांनी खंडानं घेतली. त्यांनी ही शेती करताना यात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न केला. बाजारात ज्याची मागणी असेल तेच पिकवण्यावर अधिक भर दिला.
कांदा-लसूण अनुसंशोधन केंद्राचं मार्गदर्शन
सध्या ते दहा एकर क्षेत्रावर कांद्याचं बियाणं घेताहेत. पुणे जिल्ह्यात कांद्याचं वाढतं क्षेत्र आणि शेतकऱ्यांची चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या बियाणाची मागणी लक्षात घेऊन त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे-फुरसुंगी या जातीच्या कांद्याची लागवड केली. कांदा बियाणाला खात्रीशीर बाजारभाव मिळत असल्यानं गेल्या तीन वर्षांपासून ते या बियाणाचं उत्पादन घेताहेत. याकरिता त्यांना जवळच्याच राजगुरूनगरमधील कांदा-लसूण अनुसंशोधन केंद्राचं योग्य मार्गदर्शन मिळालं. या केंद्राचे तत्कालीन प्रमुख संचालक आणि सध्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी त्यांना यात मोलाची मदत केली. मध्यम ते भारी जमिनीत कांदा बीजोत्पादन चांगलं होते. क्षारयुक्त जमिनीत याचं उत्पादन चांगलं येत नाही. तसंच हलक्या अथवा मुरमाड जमिनीत कांदा बीजोत्पादन न घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या आणि मध्यम ते भारी जमिनीत कांदा बीजोत्पादन घेणं फायदेशीर ठरतं, असा त्यांचा अनुभव आहे.
अशी केली बियाणं लागवड
सरासरी ७० ते ८० ग्रॅम वजनाचे साडेचार ते सहा सेंटिमीटर आकाराचे कांदे निवडले. १४ रुपये किलो बाजारभावानं कांद्याची खरेदी केली. त्यासाठी १ लाख ५१ हजार २०० रुपये खर्च आला. कापलेल्या कांद्यामधून केवळ एक डोळ्याचे कांदे लागवडीसाठी निवडले. ९० बाय ३० सेंटिमीटर अंतरावर कापलेल्या कांद्याची लागवड केली. माती परीक्षण करून सूक्ष्म द्रव्यांचा वापर केला. पिकाची गरज ओळखून औषध फवारणी केली. १० एकराकरिता एकूण १० लाख रुपये खर्च झाला. एकरी १५० किलो बियाणं आता त्यांना यातून मिळेल. सध्या या बियाणाला १२०० रुपये प्रती किलो याप्रमाणे बाजारभाव मिळतोय. त्यानुसार त्यांना खर्च वजा जाता १८ लाख रुपये नफा मिळेल.
कांद्याचे बाजारभाव हे सतत पडत असल्यानं राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. मात्र या पुणे-फुरसुंगी जातीच्या कांदा उत्पादनात दुहेरी फायदा मिळू शकतो. एक तर याची साठवणक्षमता अधिक असल्यानं बाजारभाव असेल त्याच वेळी विक्रीकरिता काढता येतो. शिवाय अशा प्रकारे बीजोत्पादन अधिकचा फायदाही मिळवून देतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी याचा विचार करावा, असं आवाहन आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी केलंय.
३० वर्षांत ३३ जाती विकसित
देशात गेल्या ३० वर्षांत जवळपास ३३ जाती विकसित होऊन देखील अजूनही कांदा क्षेत्र विकसित होऊ शकलेलं नाही. शेतकऱ्यांना चांगलं वाण आजही मिळेनासं झालं आहे. पुणे-फुरसुंगी ही साठवणक्षम जातही त्याला अपवाद नाही. लागवड जसजशी वाढेल, तसतसा हा प्रश्न निकालात निघेल, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
संपर्क : साहेबराव मेंगडे, मोबाईल नं. – 09822525842
Comments
- No comments found