टॉप न्यूज

गावकऱ्यांनी श्रमदानानं खोदला गावतलाव

ब्युरो रिपोर्ट

वाशीम – गावकऱ्यांनी एकत्र येऊन पडिक गायरान जमिनीवर गावतलाव खोदला. त्यामुळं गावची पाण्याची पीडा कायमची दूर झाली. शिवाय जलसाक्षरतेचं महत्त्व कळल्यानं आता प्रत्येक जण पाणी वाचवण्यासाठी धडपडतोय. दोडकी गावची ही जलकहाणी आता सर्वांसाठी आदर्श बनून राहिलीय.

 वाशीमपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेलं दोडकी हे गाव. पाण्याची टंचाई इथं पाचवीला पुजलेली. त्यामुळं लोकांच्या आणि साहजिकच गावच्याही विकासाला खीळ बसलेली. शेवटी वैतागलेल्या गावकऱ्यांनी ही खिटखिट कायमची मिटवायचा निर्धार केला. ग्रामसभेत सर्वांनी पडिक गायरान जमिनीवर गावतलाव खोदण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी ९० टक्के लोकवर्गणी काढली आणि १० टक्के जिल्हा प्रशासनाची मदत मिळवली. सुमारे ६०० लोकांची वस्ती असलेल्या या गावाची गावविहीर, तसंच शेतातील विहिरींनाही उमाळे फु़टलेत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यानं ओसाड भासणारं हे गावं आता हिरवाईनं नटलंय. 

गावातील एकीचं बळ वापरून पाणी समस्येसारखा अवघड प्रश्न श्रमदानाच्या माध्यमातून सोडवल्यानं गावकऱ्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. दो़डकी आता साधंसुधं गाव राहिलेलं नाही. जलसाक्षरतेतील आदर्श गाव झालंय. दोडकीकरांना पाण्याचं महत्त्व सांगावं लागत नाही.

गावकऱ्यांनी खोदलेल्या तलावामुळं गावातील पाण्याची पातळी वाढली असून जवळपास १५० एकर शेती सिंचनाखाली आल्याची माहिती सरपंच बंडू डव्हळे यांनी दिली.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.