टॉप न्यूज

अजित पवार अखेर रूजू

रणधीर कांबळे

अखेर अजित पवार यांनी आज अर्थनियोजन आणि ऊर्जा खात्याचा पदभार हातात घेतला. मंत्रिमंडळात येऊन बिनखात्याचे मंत्री म्हणून राहण्याचा अजितदादांचा हा पहिलाच अनुभव. ७० दिवस मंत्रिमंडळातून बाहेर राहिलेले अजितदादा स्वतःहून जरी परतले असले, तरी त्यांच्या राजीनाम्यापूर्वी जे प्रश्न होते ते अजून बाकी आहेत. त्यामुळंच सिंचन श्वेतपत्रिकेनंतरही सरकारला सिंचन विभागातल्या एकूण कारभाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा करणं भाग पडलं.

 

आता अजितदादा राज्याचं आर्थिक नियोजन करणार आहेत. त्यामुळं त्यांच्या पुढं आता मवाळ भाषा बोलण्यापासून ते काम करताना काही गोष्टींची पथ्य पाळावी लागणार आहेत. त्याशिवाय राज्य लोडशेडिंग मुक्त करण्याचं आश्वासनही ऊर्जामंत्री म्हणून पार पाडावं लागणार आहे. त्याशिवाय काम करत असताना कायद्याच्या चौकटी आणि प्रशासकीय मर्यादांचा विचार करत दादांना काम करण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.

राज्याचं मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी एनसीपी २०१४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागलीय. पण आता जोम आणि आक्रमकपणा कमी झालाय, तो सकारात्मकपणे भरून काढावा लागणार आहे.

दादांची नवी इनिंग आता सुरू झालीय. दादांचा एक दबदबा पक्षात अन् कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण कार्यकर्त्यांना बळ दिल्याचं दिसत नाही. काही ठराविक कार्यकर्त्यांचा फायदा झाल्याची अनेक उदाहरणं देता येतील, मात्र सामान्य कार्यकर्ता गेल्या तीन साडेतीन वर्षापासून वेगवेगळ्या महामंडळामार्फत काम करायला संधी मिळेल या आशेनं काम करतोय. त्याला या पुढच्या काळात काही स्पेस देण्यासाठी दादांनी पुढाकार घ्यायला हवाय. त्याशिवाय संपूर्ण पक्षाचे सर्वच्या सर्व नेते दादांच्या बचावासाठी विधीमंडळ अधिवेशनात आले, असं चित्र दिसलं नाही. त्यातून हेच स्पष्ट होतंय की अनेक नेते मोठ्या पवारांच्या शब्दाखातर पक्षात आहेत. त्यांनाही दादांनी विश्वास द्यायला हवा आहे. तर खऱ्या अर्थानं दादांची ही नवी इनिंग सुरू झालीय, असं म्हणता येईल...


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.