टॉप न्यूज

विषबाधेनं आश्रमशाळेतील दोन विद्यार्थी दगावले

ब्युरो रिपोर्ट

पुणे - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) इथल्या आश्रमशाळेत सुरेश देवराम मुठे आणि अंकुश माळी या १४ वर्षांच्या दोन मुलांचा विषबाधेनं मृत्यू झाला. यामुळं आश्रमशाळांतील गैरसोयींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय.

विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी इयत्ता आठवीत शिकणारे आहेत.  सुभाष लक्ष्मण दिघे (वय 13) हा अत्यवस्थ आहे, तर संजय विठ्ठल मुठे (वय 12) याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडल्याचं समजताच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. माजी आमदार बाळासाहेब दांगट हे या संस्थेचे संचालक आहेत. अनुदानित असणाऱ्या या आश्रमशाळेतील विद्यार्थी हे दुर्गम भागातले आदिवासी रहिवासी आहेत. अनेकदा या शाळेच्या भोजनालयात हे विद्यार्थी जेवण न करता बाहेर जाऊन खात असल्याचा आरोप संस्थाचालकांनी केलाय. बाहेर जाऊन फरसाण खाल्ल्यानं त्यांना ही विषबाधा झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय, तर आश्रमशाळेत सकस आणि पुरेसं अन्न विद्यार्थ्यांना दिलं जात नाही. भुकेले विद्यार्थी मग खाण्यासाठी बाहेर जातात, असा आरोप या मुलांच्या नातेवाईकांनी केला. 

अखेर या संस्थाचालकांवर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यावर रात्री उशिरा विद्यार्थ्यांचे  मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले.

केवळ याच नाही तर राज्यातल्या आश्रमशाळांमधील आदिवासी मुलांना योग्य अन्न दिलं जात नसल्याच्या घटना सातत्यानं समोर येताहेत. मात्र तरीही याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. आज या मुलांचा बळी गेल्यानंतर तरी सरकारला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल जागरूक नागरिक करतायत.   


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.