
सातारा - अखिल भारतीय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. साताऱ्यात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि दीव-दमण आदी नऊ राज्यांनी भाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरलाय.
केंद्रीय क्रीडा खात्यानं भारतीय खेळांमध्ये मल्लखांबाचा समावेश करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वीच घेतला होता. या पार्श्वभूमीवर देशभरात राबवलेल्या क्रीडा धोरणानुसार शालेय स्तरावर मल्लखांब स्पर्धा घेण्याचं ठरलं. यातील सांघिक आणि व्यक्तिगत पातळीवरील स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 100 खेळाडूंचा संच आणि 20 पंचांचा ताफा आला होता. यातील वैशिष्ट्य म्हणजे भाग घेणाऱ्या स्पर्धकांमधील जाणवणारी मुलींची लक्षणीय संख्या. स्पर्धकांपैकी अनेक जणांनी दहावी आणि बारावीची परीक्षा तोंडावर असतानाही अभ्यास आणि मल्लखांबाचा सराव याचा योग्य समन्वय राखत कामगिरी केलीय.
मल्लखांबाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
पेशव्यांच्या काळात यादवी युद्धं आणि आक्रमणं मोठ्या प्रमाणात होत होती. अशा धामधुमीच्या काळात दणकट आणि चपळ सैन्य दल असावं या हेतूनं त्यावेळी सैन्याला प्रशिक्षित
करण्यासाठी विविध योजना राबवल्या गेल्या. पेशव्यांच्या कालावधीत गुलामअली नावाच्या दोन पहिलवानांनी पेशवे दरबारात येऊन त्यांना हरवण्याचं आव्हान दिलं. त्यांना कुस्तीमध्ये हरवणारं कोणीही पुढे येत नव्हतं, अशा वेळी बाळंगभट्टदादा पुढं आले. बुध्दिमान असलेल्या बाळंगभट्टांची शरीरयष्टी किरकोळ होती. पण तरीही त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. जंगलामध्ये जाऊन ते डावपेचांविषयी आत्मचिंतन करू लागले. त्यांनी तिथं गेल्यावर माकडांच्या कसरती पाहिल्या. तसाच प्रयोग त्यांनी दगडी शिळेवर केला. पुढं विश्वविक्रम परिक्रमा करणाऱ्या गुलामअलींना पराभूत केलं. याच दगडी शिळारूपी मल्लखांबाचं पुढं लाकडी मल्लखांबामध्ये रूपांतर झालं. हा लाकडी खांब म्हणजे माणसाच्या धडाची प्रतिकृतीच असते. मानेप्रमाणं गोल, तर धडाप्रमाणे उभा सरळ घसरट असलेला हा खांब रोवलेला असतो आणि त्यावर होणाऱ्या कसरती म्हणजेच मल्लखांब.
Comments
- No comments found