टॉप न्यूज

घोषणा नको, काम करा - पवार

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - लोकानुनय करणाऱ्या घोषणा निवडणुकीपूर्वी करून निवडुका जिंकता येत नाहीत, असं सांगत वास्तवात न येणाऱ्या घोषणा न करता लोकांसाठी गंभीरपणानं काम करण्याचा आदेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेतेमंडळींना दिलाय.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या नूतनीकरणानंतरच्या उद्घाटन प्रसंगी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं 144 जागा लढल्या. त्यापैकी 62 जागा पक्षानं जिंकल्या. अनेक जागी आपला उमेदवार पराभूत झाला, त्या ठिकाणीही विकासाची कामं आपण केल्याचं शरद पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. आता जर निवडणुकीत 100 चा आकडा गाठायचा असेल तर अधिक काम करावं लागेल. पक्ष ठरवेल त्या भागात 70 ते 80 टक्के निधी विधान परिषद सदस्यांनी देण्याचं धोरण ठेवलं होतं. त्यामुळं ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव झाला त्या ठिकाणी 55 कोटी रुपये खर्च झालेत. या कामासाठी 2-3 सदस्यांकडून हा निधी पक्षाकडं पोहोचला नाही, त्यांची काळजी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी, असं सुचवत ज्यांना दीर्घकालीन राजकारण करायचं आहे, त्यांनी पक्षाचं ऐकावं, असा इशाराही त्यांनी दिला.

देश सध्या आर्थिक संकटातून चालला असून स्थिरतेची गरज आहे. विकासाचा दर 7-8 टक्के ठेवण्याचा प्रयत्न असला तरी हा दर वाढवावा लागेल, असा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत मांडला गेला होता. याकडं लक्ष वेधून पवार म्हणाले, की विकासाचा दर वाढवायचा असेल तर अधिक गुंतवणूक करायला हवी. गेल्या वर्षात देशाच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळं विकासकामांवर मर्यादा येताहेत. मर्यादित साधनसंपत्ती असताना आपण अधिक गुंतवणूक करून विकासाचा दर वाढवल्याशिवाय गरिबी दूर करता येणार नाही. त्यामुळं कशासाठी पैसा खर्च करायचा याचा विचार करण्याची वेळ आलीय. सरकारनं 18रुपये किलोनं खरेदी केलेला गहू आपण गरिबांना 2 रुपयानं देतो. त्यामुळं गहू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळं जर गहू उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकाकडं वळला तर पुन्हा अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं कुठलाही निर्णय घेताना लोकप्रियतेसाठी न घेता वास्तवाचं भान ठेवून निर्णय घ्यावा, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.