टॉप न्यूज

मुरूडमध्ये 'पद्मदुर्ग'चा जागर

ब्युरो रिपोर्ट

अलिबाग - पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी मुरूड पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मुरूड फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून 'पद्मदुर्ग जागर' हा कार्यक्रम राबवण्यात आला. 

रायगड जिल्ह्यातल्या मुरूडला ऐतिहासिक वारसा लाभलाय. सिद्धी आणि मराठे या दोन घराण्यांच्या पाऊलखुणांचं आजही इथं अस्तित्व जाणवतंय. सिद्दी घराण्याची साक्ष देणारा अभेद्य जंजिरा आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण सांगणारा पद्मदुर्ग ही मुरूडची ओळख आहे. 

यावेळी शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मुरूडच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पद्मदुर्गची आज दुरवस्था झालीय. छत्रपतींचा हा किल्ला सरकार दरबारी उपेक्षितच राहिलाय. सातत्यानं ढासळणारे बुरूज आणि भिंतींमुळं पर्यटकांनीही त्याच्याकडं पाठ फिरवलीय. किल्ल्याच्या या परिस्थितीकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 'पद्मदुर्गाचा जागर' हा कार्यक्रम करण्यात आला.

जंजिऱ्याचा इतिहास 

जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अॅबिसीनिया देशाचे रहिवासी. ते दर्यावर्दी, शूर आणि लढवय्ये होते. त्यांनी प्राणपणानं जंजिऱ्याचं रक्षण केलं.  अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आलं नाही.  इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षं जंजिरा अजिंक्य राहिला. जंजिऱ्याचं प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीनं आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपद्वार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. 

शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच-सहा कि. मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरूडचा जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.