अलिबाग – मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांपासून रायगड जिल्हा जवळ असल्यामुळं रोजच्या धामधुमीच्या जीवनात विरंगुळा मिळावा यासाठी इथला चाकरमानी असो वा कॉलेजियन्स मॉब... त्यांना इथली पर्यटन स्थळं खुणावू लागतात. याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठीही राज्यभरातून इथं पर्यटकांनी तोबा गर्दी केलीय.
सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. पर्यटकांची वाढती गर्दी पाहून हॉटेल व्यावसायिकांनीही आकर्षक पॅकेजेस आणि विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय.
रुपेरी वाळू, निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा याच्या सान्निध्यात सरत्या वर्षाची शेवटची संध्याकाळ घालवणं कोणाला आवडणार नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून नव्या वर्षाचे नवे संकल्प करण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत.
रायगडमधील अलिबाग, मुरूड, हरिहरेश्वर आणि दिवेआगर इथं पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरूड परिसरात गेल्या चार दिवसात २५ ते ३० हजार पर्यटकांनी भेट दिलीय.
नाताळच्या सुट्टीपासूनच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलीय. हॉटेल व्यावसायिकांनी यानिमित्तानं मोठ्यांपासून बच्चेमंडळींची काळजी घेतलीय. यामध्ये डीजेसह बोटिंग, पॅरासेलिंग, जॉईंट बॉल इत्यादी खेळांचा आनंद उपस्थित पर्यटक लुटतायत.
Comments
- No comments found