टॉप न्यूज

बलात्कारविरोधी कठोर कायदा हीच श्रद्धांजली - मुख्यमंत्री

ब्युरो रिपोर्ट

मुंबई – बलात्कारासारखा मानवतेला कलंक असलेल्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा व्हावा, त्याची तातडीनं अमलबजावणी व्हावी, हीच दिल्लीमधील पीडित तरुणीला खरी श्रद्धांजली ठरेल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. 

दिल्लीमधील सामूहिक बलात्कारानंतर गेले 13 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय. आपल्या शोकसंदेशात चव्हाण यांनी म्हटलंय की, अलीकडच्या कालावधीत महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण दुर्दैवानं वाढलंय. एकीकडं शिक्षणाचा सर्व स्तरावर प्रसार होत असताना अशा प्रकारची अमानवी कृत्यं वाढणं हे चिंताजनक आहे. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असणं आवश्यक आहे. तसंच स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांची सुनावणी विशेष जलदगती न्यायालयामार्फत कमीत कमी कालावधीत होणं आणि गुन्हेगारांना शिक्षा होणं आवश्यक आहे. आपण आपल्या स्तरावर यासंदर्भात केंद्र सरकारकडं पाठपुरावा करणार आहोत. कठोर कायदे, जलद सुनावणी, शिक्षेची तातडीनं अंमलबजावणी याचबरोबर सामाजिक प्रबोधनासारखे उपाय योजूनच अशा प्रकारच्या घटना टाळणं शक्य आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

नवी दिल्लीतील या घटनेनंतर देशभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मी राज्याच्या गृहमंत्र्यांसमवेत वरिष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेऊन अशा प्रकारच्या राज्यात घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा घेतलाय. सध्याच्या जलदगती न्यायालयांपैकी 25 जलदगती न्यायालयं स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी असावीत, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भविष्यकाळात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी गृह विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात, असं मुख्यमंत्री चव्हाण यांनी पुढं म्हटलंय.

दिल्लीतील घटनेमुळं संपूर्ण देशभरात, विशेषतः तरुण वर्गात निषेधाची लाट उसळलीय. ती स्वभाविकही आहे. अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मात्र, निषेध वा निदर्शनं करताना सामाजिक शांततेला तडा जाऊ न देता कायदा आणि सुव्यवस्था पाळून शांततामय मार्गानं करण्याचं भानही निदर्शकांनी पाळलं पाहिजे, असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.