
मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरांमध्ये डिस्को थेक, पब आणि मॉल गर्दीनं भरून वाहत होते. लहानमोठ्या पाटर्या, भराभरा उसळणारा फेस... डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई... चीअर्स...चीअर्स माय डियर... असा धुंद, बेधुंदपणा संपूर्ण वातावरणात भरला होता. तर तिकडं गावाकडं बांधाबांधांवर हुरड्याच्या, वांगीभरताच्या आणि रोडग्याच्या पाटर्या झोकात सुरू होत्या.
सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षासाठी नवी उमेद देणारं मराठमोळं गाणं गुणगुणत नूतन वर्षाचं स्वागत केलं गेलं.
गेल्या काही वर्षांपासून थर्टी फर्स्टचा माहोल पुरता बदलून गेलाय. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सेलिब्रेशनच्या रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. गणेश विसर्जनाला असतो एवढा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच दिली होती. शहरांमध्ये हे असं सगळं सुरू असताना गावांमध्ये कसलाही पोलीस बंदोबस्त नव्हता. शेकोट्यांभोवती गप्पांचे फड रंगले होते. हुरड्याच्या, भरताच्या आणि रोडग्याच्या पाटर्या दणक्यात झाल्या. त्यातूनच एखादं चुकार पाखरू झोकात हॅप्पी न्यू इअर... म्हणत निघून जाताना खसखस पिकत होती.
खान्देशात भरीत पार्टी
खान्देशात भरीत पाटर्या जोशात सुरू होत्या. कुटुंबासह सर्व जणांनी याचा आस्वाद घेतला. भरताबरोबर कळण्याची भाकरी किंवा पुरी, शिवाय टोमॅटोची कोशिंबिर, फलाहार आणि त्याबरोबरच एखादा गोड पदार्थ असा फक्कड बेत या भरीत पार्टीत रंगला.
हुरडा आणि रोडगाही
गुलाबी थंडीत गरमागरम हुरडा खाण्यासाठी शहरात राहणाऱ्या अनेक जणांनी गावाचा रस्ता धरला होता. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखाली हुरडा पाटर्या रंगल्या होत्या. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रात या मोठ्या प्रमाणात होतात, तर विदर्भात रोडगा पार्टी रंगल्या होत्या. हे रोडगे गोवऱ्यांच्या विस्तवावर शेकले जात असताना आपल्या माणसांची जी ऊब जाणवत होती, ती जगात दुसरीकडं कुठे मिळू शकेल? शेवटी 'हॅप्पी न्यू इअर' तुम्हाला... सर्वांना!
'हॅप्पी न्यू इअर', नवीन हे वर्षं सुखाचं जावो!!
Comments
- No comments found