टॉप न्यूज

राज्यसभेसाठी रजनी पाटील यांची निवड निश्चित

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - विलासराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांची निवड निश्चित झालीय. सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणा-या रजनी पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

एनएसयुआयपासून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणा-या रजनी पाटील यांनी बीड मधून लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलीय. त्याचप्रमाणं त्यांनी केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचंही काम पाहिलं होतं. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम केलं. मात्र, 1996 मध्ये रजनी पाटील यांना भाजपतर्फे बीड मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली व ती निवडणूक जिंकून त्या 11व्या लोकसभेत सदस्य झाल्या. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्या पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्या. तेव्हांपासून त्या सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. 

रजनी पाटील यांचे वडील आत्माराम पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते. गदर चळवळीचे एक शिल्पकार आणि त्याबद्दल लाहोरला फासावर गेलेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या त्या नात आहेत. त्यांच पती अशोक पाटील हे राज्यात मंत्री होते. या जागेसाठी माजी कृषीमंत्री रोहिदास पाटील, अनंत गाडगीळ हे ही इच्छुक होते.

विलासराव देशमुख यांची मार्च-2012 मध्येच राज्यसभेवर सहा वर्षांसाठी फेरनिवड झाली होती. या जागेची मुदत 2018 पर्यंत असल्यानं रजनी पाटील यांना जवळपास पाच वर्षे व तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.