टॉप न्यूज

घायाळ ही हरिणी...

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आणि वन्यप्राणी असले तरी वन्यखात्याचं म्हणावं तेवढं लक्ष नसल्यानं त्यांची राजरोसपणे कत्तल सुरु आहे. हरणं, मोर, काळवीटं यांची शिकार करुन त्यांच मांस उघडपणे बाजारात विक्रीला आणलं जातंय. भरीसभर म्हणजे अपघातात वन्यप्राण्यांचा बळी जाण्याचे प्रकारही वाढलेत. 

गोंदियाजवळच नागझिरा अभयारण, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान आहे. या जंगल भागातील रस्त्यावर साधे सूचना फलकही नाहीत. त्यामुळं बेदरकारपणं गाड्या चालवणं आणि त्यात वन्यजीवांचा बळी जाणं, इथं नित्याचंच झालंय. अपघातात जखमी होणाऱ्या वन्यप्राण्यांविषयी तर वन खात्याला काहीचं पडलेलं नाही. मुकी बिचारी कशीही मरतात. 

अलिकडंच गोंदिया एस.टी. बस स्टॅण्डच्या आवारात जखमी हरणं आलं. एस.टी. प्रशासनानं तातडीनं ही माहिती वन खात्याली दिली. पण...कोणी कर्मचारी वेळेत आला नाही. एकतर जखमी आणि परत रस्ता चुकल्यानं सैरभैर झालेल्या या हरणाची एस.टी कर्मचाऱ्यांनाच दया आली. त्यांनी त्याला पकडलं. त्याची माहिती देऊनही त्याला उपचारासाठी हलवण्यासाठी वन विभागानं कसलेचं वाहन उपलब्ध करुन दिले नाही. शेवटी एस.टी कर्मचाऱ्यांनी चक्क बसमधूनंच जखमी हरणाला पशुसंवर्धन विभागाकडं सुपूर्द केलं. गोंदिया वन विभाग वन्य जीवांसाठी किती तत्पर आहे, याचं हे ताजं उदाहरण.

दरम्यान, काही लोकांनी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी हे हरण पकडून आणलं होतं. नंतर त्यांच्या तावडीतून सुटून त्यानं शहराकडे धाव घेतली असावी, अशा काहींचा अंदाज आहे. या जखमी हरणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची तब्येत आता चांगली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.