टॉप न्यूज

सारंगखेड्याचा घोडेबाजार गजबजला....

ब्युरो रिपोर्ट

नाशिक – पायवाटेची सडक झाली. पुढं साधे रस्ते झाले. हळूहळू त्यांचं डांबरीकरण झालं. एकपदरी महामार्ग झाला. तो आता दोन पदरी, चार पदरी, झाला. द्रुतगती महामार्ग आले. त्यावर मर्सिडीजसारख्या चकचकीत गाड्यांमधून आरामात सुसाट वेगानं जाता येतं. तरीही माणसांचं एकेकाळंच दळणवळणाचं मुख्य साधन असलेल्या घोड्याचं वेड काही जात नाही. सारंगखेड्याचा भरात आलेला घोडेबाजार त्याचीच साक्ष देतोय.

खान्देशातील सारंगखेडा हे तापी नदीच्या तीरावर वसलंय. या ठिकाणी साधारणत: 300 वर्षांचे एकमुखी दत्तमंदिर आहे. या जागृत देवस्थानामुळं दर दत्त जयंतीला सारंगखेड्यात यात्रा भरते. पुढचे पंधरा दिवस ही यात्रा सुरू असते. यावेळीच घोडेबाजार भरतो. हौसे, नवसे, गवसे...असे सर्वचजण येथे आवर्जून हजेरी लावतात. परंपरेप्रमाणं दत्त जयंतीला सुरू झालेल्या या घोडेबाजारात आजपर्यंत सुमारे दोन कोटीच्या वर उलाढाल झालीय. अजून दहा दिवस बाजार सुरू राहणार असून तोपर्यंत एकूण उलाढाल आठ कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.

रेसचे नव्हे, सवारी घोडे

सध्या बाजारात असणाऱ्या चकचकीत महागड्या गाड्यांच काय घेऊन बसलात! त्यापेक्षा कितीतरी महागडे घोडे या बाजारात विक्रीसाठी आहेत. सीनेसृष्टीतील कलाकारांपासुन ते देशाच्या कानाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची नस्ल वेगळी असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पहायला मिळतात. मात्र, लगन्कार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढे बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणाऱ्या नवश्रीमंतही इथं खरेदीसाठी येताहेत.

पंजाब, मारवाड आणि काठीयावाडही... 

हा घोडेबाजार साधारणत: साठच्या दशकात सुरू झाला, असं सांगितलं जातं. काहीजण तर इथं शिवकालापासून घोड्याची खरेदी-विक्री होत असल्याची आख्यायिका सांगतात. 64-65 साली सारंगखेड्यात घोड्यांचा बाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याची नोंद आहे. घोड्यांच्या बाजाराची एक मालिकाच आहे. आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढं हा बाजार हलतो नांदेड माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्याच शिरपुरात हा बाजार येतो. सारंग-खेड्याच्या बाजारात पंजाब, मारवाड, काठीयावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे घोडे विक्रीसाठी येतात. विविध नस्लींमध्ये वेगवेगळी वैशिष्टे असलेले आणि वीस हजार ते लाखांच्या घरातील किमतीचे घोडे यात्रेत उपलब्ध आहेत.

बाजार समितीला उत्पन्न

घोडेबाजारावर सारंगखेडा ग्रामपंचायत आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियंत्रण आहे. या बाजारात होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर शेकडा एक टक्का आकार लावला जातो. त्याचप्रमाणं एक रुपयाला पाच पैसे या दरानं शुल्कही घेतलं जातं. 

पंधरा दिवस चालणाऱ्या या घोडेबाजारामुळे सारंगखेडा परिसराच्या अर्थकारणालाही चालना मिळते. गवत विकणारे, घोड्यांच्या साज-श्रृंगाराचे साहित्य विकणारे, हॉटेल व्यावसायिक अशा विविध घटकांना या बाजारामुळे रोजगार मिळत असल्यानं सारंगखेडा सध्या खुषीत आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.