टॉप न्यूज

सवाल विचारण्याची धमक ठेवा - नाना पाटेकर

ब्युरो रिपोर्ट

ठाणे - ''रस्त्यात कुणी काही गैर करताना दिसला तर त्याला 'काय करतो रे?' असं विचारण्याची ताकद आपल्यात हवी. त्यावेळी तडजोड केली तर आपण तिथं पहिल्यांदा मरतो. मग रोज मरतो. कायम मरत राहतो. कुणी तरी जाळेपर्यंत जगत राहतो. आपण तसं नाही जगलं पाहिजे,'' असं आपल्या खास शैलीत सुनावलंय अभिनेते नाना पाटेकर यांनी.

'पोलीस डे'निमित्त ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी 'लढा बदलत्या सामाजिक गुन्ह्यांशी' या विषयावर नाना पाटेकरांनी आपली ही रोखठोक भूमिका पुन्हा एकदा मांडली. त्याला संदर्भ होता, दिल्लीत नुकत्याच घडलेल्या बलात्काकार प्रकरणाचा. 

ठाणे वाहतूक पोलिसांनी १ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केलाय. त्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर मेणबत्या घेऊन आंदोलनं झाली. आता त्या मेणबत्यांची जागा तलवारींनी घ्यायला हवी, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातल्या सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, ' महाराष्ट्राच्या काही भागांत अगदी चूळ भरण्याएवढंसुद्धा पाणी नाही. आपल्या सगळ्या योजना शहरांपुरत्या मर्यादीत असतात. आदिवासी , खेडोपाड्यातल्या लोकांचा विचारच होत नाही.' 

तसंच 'पोलिस आणि शिक्षक हे आपल्याकडं दोन उपेक्षित घटक आहेत. पोलिसांच्या क्वार्टर्स एकदा जाऊन पाहा. म्हणजे मग ते कसल्या परिस्थितीत राहतात हे कळेल. या दुर्लक्षामुळंच तर एका पोलिसाचा मुलगा आज कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन बनलाय', असं ते म्हणाले.

'चांगल्या कामाचं कौतुक व्हायलाच हवं. पण सध्या कुणीही उठतो आणि जीवनगौरव करतो. अगदी नामवंतही हे पुरस्कार घेतात. तुम्ही कोण आहात? हे त्यांना विचारलं गेलं पाहिजे', अशी अपेक्षाही नाना पाटेकरांनी यावेळी व्यक्त केली. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.