टॉप न्यूज

पुन्हा जैतापूर विरोधाचा नारा

मुश्ताक खान

रत्नागिरी - बहुचर्चित जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातील आवाज नवीन वर्षात पुन्हा एकदा बुलंद झाल्याचं चित्र आज पहायला मिळालं. प्रकल्पविरोधी जनहित सेवा समिती आणि मच्छीमार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी आज मोर्चा काढण्यात आला.  आमचा जैतापूर प्रकल्पाला कायम विरोध आहे, हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

तीन हजार जण सहभागी

केंद्र शासनातर्फे तालुक्‍यातील माडबन इथं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पामुळं धोका असून त्यामुळं कोकण उद्‌ध्वस्त होणार असल्याची भीती व्यक्त करीत त्याला स्थानिक ग्रामस्थांकडून जोरदार विरोध केला जात आहे. मधल्या काळात प्रकल्पाविरोधाची धार काहीशी कमी झाल्याचं वाटंत असताना आज हा मोर्चा निघाला. शिवसेना आमदार राजन साळवी, भाकपचे नेते डॉं. प्रकाश रेड्डी, मच्छीमार संघटनेचे नेते अमजत बोरकर, शिवसेनेचे राजन महाडिक, आदींनी मोर्चाचं नेतृत्व केलं. साक्रीनाटे गावापासून निघालेल्या या मोर्चात तीन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. 

प्रकल्पच नको...

माडबन इथं मोर्चा विसर्जित होऊन सभा झाली.यावेळी आमदार साळवी, रेड्डी आणि बोरकर यांनी जैतापूर प्रकल्प कोकणच्या विकासाला मारक असून त्याला शेवटपर्यंत विरोध करण्याचा निर्धार बोलून दाखवला. समुद्रावर हजारो मच्छीमारांचं पोट अवलंबून आहे. प्रकल्पामुळं समुद्र दूषित होऊन त्याचा विपरीत परिणाम मच्छीमारांच्या जीवनावर होईल. शेतीवर, फळबागांवर तसंच एकूणच पर्यावरणावर परिणाम होऊन कोकणचा विकास ठप्प होईल. त्यामुळं हा प्रकल्प आम्हाला नको...अशी हाक देऊन विरोध आणखी तीव्र करु, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सभेनंतर आंदोलकांनी प्रकल्पस्थळाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.