
मुंबई - राज्यातली जनता दुष्काळात होरपळतेय आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या दुष्काळाचं राजकारण करण्यात, मग्न आहेत, असं चित्र समोर येतंय. यात पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असं राजकारणही रंगू लागलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच दुष्काळाचा रोड मॅप तयार करून सर्व नेते, मंत्री आणि कार्यकर्ते यांना थेट काम करण्याचे आदेश दिले. त्यावर हा सारा रोडमॅप बनवला गेलाय पश्चिम महाराष्ट्रासाठी, असा सूर काँग्रेसमधून उमटतोय. अर्थात राष्ट्रवादीचा पायाच पश्चिम महाराष्ट्र असल्यानं ते साहजिकही आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग काँग्रेसनं आता मराठवाड्यातल्या दुष्काळावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यासाठी प्रदेश पातळीवरची एक खास समिती नेमलीय. या समितीत काँग्रेसचे सर्व जिल्हा अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ही समिती मराठवाड्यातल्या दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे. समितीनं केलेल्या उपाययोजनांवर सरकारी पातळीवर तातडीनं कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एक बैठकही घेणार आहेत. त्याशिवाय याबाबत एक शिष्टमंडळही दिल्लीला जाऊन मराठवाड्यातल्या दुष्काळावरील उपाययोजना करण्याची मागणी करणार आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या गोष्टी आज स्पष्ट केल्या.
एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी असे डाव प्रतिडाव टाकले जातायत. येत्या 9 जानेवारीला काँग्रेस पक्षाची एक बैठक आयोजित करण्यात आलीय. त्यामध्ये राज्यातल्या राजकीय स्थितीची चर्चा करण्यात येणार आहे. 2014मधल्या निवडणुकीचा विचार करून राज्यात कुठला कार्यक्रम राबवायला हवा, याचीही चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे. या बैठकीला मंत्री, आमदार, खासदार सर्व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीचा आढावा खुद्द मुख्यमंत्री काही मंत्र्यांच्या सहाय्यानं घेणार आहेत. त्याचवेळी आपला मित्रपक्ष जो वारंवार स्वबळाची भाषा करतो त्याला कसे उत्तर द्यायचे हेही ठरवण्यात येईल, असे संकेत प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलेत.
याचवेळी काँग्रेसनं आघाडीचा धर्म पाळला असल्याचं राज्यात ठासून सांगितलंय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक ठिकाणी शब्द पाळला नाही, याकडंही काँग्रेसनं लक्ष वेधलंय. माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, नंदूरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचाच भाऊ काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढला. विधानपरिषद निवडणुकीत जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचा भाऊच काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात लढला आणि नंतर निवडून आला. त्यानंतरही विदर्भात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट साथ दिली. ही उदाहरण देत असताना राष्ट्रवादीनं आम्हाला दगा दिलाय, असं मात्र म्हणायचं त्यांनी टाळलं.
याचाच अर्थ स्पष्ट होतोय की, काँग्रेसचे नेते अजूनही राष्ट्रवादीला थेट आणि आक्रमक उत्तर देण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पाहताहेत. त्यामुळंच माणिकरावांनी, आमचा निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतात. राष्ट्रवादीचं नेतृत्व मात्र त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहेत, असही सूचकपणानं म्हटलं. त्याशिवाय आमचा पक्ष मोठा पक्ष आहेच, मग कुणी बरोबर असलं तरी किंवा नसलं तरी...हेही सांगायला ते विसरले नाहीत.
Comments
- No comments found