टॉप न्यूज

'सुधारित महिला धोरण'

ब्युरो रिपोर्ट

सातारा : महिलांना सक्षम आणि सबल करण्यासाठी राज्य शासन कटिबध्द असून तिसरं सुधारित महिला धोरण यावर्षी निश्चितपणं आणलं जाईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  केलं.

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 182 वी जयंती आणि भारतीय स्त्रीमुक्ती दिनाचं औचित्य साधून राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ खंडाळा तालुक्यातील नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावी आज मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचं वाटपही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. या समारंभात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, महिला आणि बालकल्याण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

महिला धोरण सर्वप्रथम आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, "राज्यानं पहिलं व दुसरं महिला धोरण आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या धोरणाद्वारे महिला शिक्षण आणि सबलीकरणाच्या अनेकविध योजना राबवल्या. महिला संरक्षण आणि सक्षमीकरणाचा यापुढचा टप्पा गाठण्यासाठी तिसरं सुधारित महिला धोरण 2013 मध्ये आणण्यात येणार आहे.”

महिला आणि मुलींसाठी राज्य सरकार विविध योजना प्रभावीपणं राबवत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, "राज्य सरकारमार्फत महिलांसाठी सुकन्या योजना राबवण्यात येणार असून महिलांना सक्षम करण्याबरोबर त्यांच्या संरक्षणाच्या कामालाही सरकारनं प्राधान्य दिलं आहे. एलआयसीच्या माध्यमातून मुलगी जन्माला येताच काही रक्कम तिच्या नावानं ठेवणार असून ही योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल. याबरोबर 12 वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना, महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला मदत, एमआयडीसीमध्ये महिला उद्योजकांसाठी प्लॉटसाठी आरक्षण ठेवणाऱ्यांबरोबर विभाग स्तरावर महिलांसाठी वसतिगृह योजना दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणार आहे.”

महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्याच्या कामास राज्य शासनानं प्राधान्य दिल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची सूचना दिली असून अत्याचारपीडित महिलांची प्रकरणं त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट ही संकल्पना राबवण्याचा मानस असून राज्यात नवीन 25 न्यायालयं लवकरच सुरू करण्याबाबत सरकारचा पाठपुरावा सुरू आहे.”

नायगाव प्रेरणास्थळ : भुजबळ

सावित्रीबाई फुले यांची नायगाव येथील जन्मभूमी प्रेरणास्थळ असल्याचे उद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांचंही नाव सामाजिक कार्यात चिरंतन असून असं जगात दुसरं उदाहरण नाही. त्यामुळं फुले दांपत्य जगात सामाजिक क्रांतीचं प्रतीक ठरलं आहे. नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचं स्मारक, शिल्पसृष्टी आणि परिसर अभ्यासक आणि पर्यटकांसाठी प्रेरणास्थळ असून या परिसराच्या विकासासाठी आणि अभ्यासक तसंच पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 शाळांमध्ये कराटे शिक्षण सक्तीचं - पाटील

महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या 4 थी ते 7 वीपर्यंतच्या शाळांमध्ये ज्युडो, कराटेचं शिक्षण सक्तीचं केलं जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली. महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शासनामार्फत सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियान आजपासून राबवलं जात असून त्यातून महिलाविषयक कायदे आणि योजनांची व्यापक प्रमाणावर जागृती केली जाणार असल्याचं सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.