टॉप न्यूज

सोलापुरात पेटलं पाणी

ब्युरो रिपोर्ट

सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर पाणीटंचाई निर्माण झालीय. औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्यानं सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा दोन दिवसाआड पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. विशेष म्हणजे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या जिल्ह्यातच पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झालीय.

 सहा महिने कसे जाणार...

येणाऱ्या काही महिन्यांत सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून बिकट होऊ शकतो, असं जाणकार सांगतात. दुष्काळामुळं रब्बी पिकं करपू लागलीयत तर पाणी आणि चारा प्रश्नामुळं जित्राबांचे हाल होत आहेत. यामुळं पुढील सहा महिने कसे काढायचे, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढं आ वासून आहे.

सरकारी पूर्वनियोजनाचा अभाव 

पाणीटंचाईचा प्रश्न तसा सोलापूर जिल्ह्याला नवीन नाही. वर्षानुवर्षं इथले लोक पाणीटंचाईचे चटके सोसत आहेत. राजकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून आणि सरकारनं दीर्घकालीन पूर्वनियोजन करून पाण्याचा प्रश्न हातळला असता तर आज एवढी पाण्याची भयावह स्थिती झाली नसती, अशी सोलापूरकरांची भावना आहे.

हिप्परगा तलावावर आंदोलन

हिप्परगा तलावातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतो. शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर भाजप आणि बसपचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी हिप्परगा तलावातून शेतीसाठी होत असलेला पाणीउपसा बसप नगरसेवकांनी बंद पाडलाय आणि पाईपलाईन, शेतीपंप तसंच डेपोची मोडतोड केलीय. संबंधित शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी सरकारला केलीय.

दोन दिवसाआड पाणी

सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळं दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय. सोलापूर शहरासाठी औस बंधऱ्यातून पाणीपुरवठा होतो. परंतु या बंधाऱ्यातील पाण्यानं सध्या तळ गाठलाय. सध्या चार दिवस पुरेल एवढाच पाण्याचा साठा शिल्लक आहे.

शिष्टमंडळ कर्नाटकला जाणार...

कर्नाटकातील अलमट्टी धरणाचं पाणी महाराष्ट्रातील (सोलापूर जिल्ह्यातील) औज बंधाऱ्यात सोडण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे शिष्टमंडळासह लवकरच कर्नाटकला जाणार आहेत. दरम्यान, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री शेट्टर यांच्याशी चर्चा केली आहे.

उजनीतून भीमा-सीना नदीत पाणी सोडणार

सोलापूर शहरावरील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उजनी धरणातून भीमा व सीना नदीत सहा टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं स्पष्ट केलंय.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य -जिल्हाधिकारी

याबाबत 'भारत4इंडिया'शी बोलताना सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे म्हणाले,``पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असल्यानं उजनी धरणातून भीमा-सीना नदीत सोडण्यात येणारं पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरता येणार नाही. नदीकाठचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबतचे आदेश वीज मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याला दिले आहेत. सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं; तसंच सोलापूरकरांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा.``

सोलापूरकरांनो अजून दहा दिवस थांबा

उजनीचं पाणी सोलापुरातील औज बंधाऱ्यात पोहोचायला अजून दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळं शहरवासीयांना हे पाणी मिळण्यासाठी अजून दहा दिवस तरी वाट बघावी लागणार आहे.

उजनी जलाशय सद्यस्थिती

पाण्याची पातळी : 491.102 मीटर

उपयुक्त पाणीसाठा : 14.25 द.ल.घ.मी.

एकूण पाणीसाठा : 1817.06 द.ल.घ.मी.

टक्केवारी : 0.94 टक्के


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.