टॉप न्यूज

माणसाचे पूर्वज फोडतायत टाहो

ब्युरो रिपोर्ट

परभणी - गोदावरीच्या काठावरील एका बेटावर ५०-६० वानरं गेल्या सहा महिन्यांपासून अडकून पडलीत. त्यांची उपासमार होत असून काहींचा मृत्यूही झालाय. माणसाच्या काळजाला चटका लावणारी ही गोष्ट असून त्यांची सुटका करण्यासाठी कोणीच पुढं येत नाहीये. भुकेनं कासावीस झालेले हे माणसाचे पूर्वज आर्त किंकाळ्या फोडतायत... खूप भूक लागलीय, आम्हाला वाचवा हो! 

पालम तालुक्यातील गोदावरी नदीतील जांभूळ बेट हे एक पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात गोदावरी नदी कोरडी असल्यानं या बेटावर ५० ते ६० वानरांची एक टोळी अन्नाच्या शोधात गेली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोदावरीला अचानक पूर आल्यानं या बेटाभोवती पाण्याचा वेढा पडला. याशिवाय समोर असलेल्या दिग्रस बंधाऱ्यामुळं पुराचं पाणी अडवलं गेल्यानं जांभूळ बेटाभोवती वाढलेलं हे पाणी आजही कायम आहे. परिणामी ही वानरांची टोळी मागील सहा महिन्यांपासून या बेटावर अडकून पडलीय. सुरुवातीला काही दिवस या ठिकाणी मुबलक अन्न होतं. त्यामुळं वानरांनी या अन्नावर तग धरला. परंतु, आता खाण्यायोग्य अन्न संपल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. केवळ चिंचेच्या पाल्याशिवाय दुसरं कोणतंच खाद्य मिळत नसल्यानं तो खाऊन-खाऊन १०-१२ पिलांचा मृत्यूही झालाय. 

ही बाब या परिसरात मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी आजूबाजूच्या गावांतून भाकरी-पोळी जमा करून या वानरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली. परंतु, वानरांची संख्या जास्त असल्यानं त्यांचं पोट काही भरत नाही. ते उपासमारीत कसेबसे दिवस ढकलतायंत आणि मदतीसाठी मोठ्या आशेनं माणसांकडं पाहतायत.

वानरांना दुसरीकडं हलवा - स्थानिकांची मागणी

या परिसरातील वानरांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्यानं कमी झालीय. त्यातंच जांभूळ बेटावर वानर अडकल्यानं स्थानिक नागरिकही हैराण झालेत. परंतु वन विभागाकडून मात्र या वानरांची सुटका करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सकारात्मक हालचाली होत नाहीयेत. मरण पावलेल्या वानरांपैकी पंचनामा करण्यायोग्य शव न मिळाल्यानं वन विभागाकडून केवळ ठिकाणाचा पंचनामा केला गेलाय.  "वानरांना इथून हलवणं हे त्यांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. त्यांच्या खाण्यापिण्यासाठी भाजीपाल्याची व्यवस्था करणार,” असं सांगून वन विभागाचे सहाय्यक वन उपसंरक्षक यू.एस. ब्राह्मणे वेळ मारून नेत आहेत. तिकडं वानरांचा भुकेअभावी जीव चाललाय... ते मुके जीव एवढंच म्हणतायत... खूप भूक लागलीय, आम्हाला वाचवा हो! 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.