
सोलापूर - सोलापूर शहरासह जिल्ह्यातील इतर टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी अखेर कालपासून उजनी धरणातून सहा टीएमसी पाणी भीमा आणि सीना नदीत सोडण्यास सुरुवात झालीय. हा पाण्याचा विसर्ग दहा दिवस सुरू राहणार आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरावं, असे आदेश प्रशासनान दिलेतं. सध्या उजनी धरणातील पाण्याची पातळी मृतसाठ्यात गेलीय. यापुढील काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्याचं नियोजन प्रशासनानं केलंय.
नदीकाठचा विद्युतपुरवठा खंडित
गुरुवारवारपासून (3 जानेवारी) दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा व सीना नदीत 6 टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. भीमा नदीत 4.5 टीएमसी, तर सीना नदीत 1.5 टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. भीमा नदीत 6600 क्युसेक्स प्रती सेकंद आणि सीना नदीत 900 क्युसेक्स प्रती सेकंद पाणी सोडलं आहे.
शेतीसाठी पाणीउपसा होऊ नये म्हणून वीज मंडळाने नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केलाय. शेतीसाठी नदीवरून पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी दिलेत.
दहा दिवस लागणार
उजनीतून भीमा नदीत सोडलेलं पाणी सोलापुरातील औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून दहा दिवस लागणार आहेत. औज बंधाऱ्यातून सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. उजनी धरण ते औज बंधारा यामधील अंतर 207 किलोमीटर आहे. पाणी सोडल्यामुळं सोलापुरात आशादायी वातावरण निर्माण झालं आहे.
उजनी धरणातील सध्याच्या जलाशयसाठ्याची स्थिती
पाण्याची पातळी - 491.082 मीटर
उपयुक्त पाणीसाठा - 10.29 द.ल.घ.मी.
एकूण पाणीसाठा - 1813.10 द.ल.घ.मी.
टक्केवारी - 0.68 टक्के
Comments
- No comments found