टॉप न्यूज

'लोकहो आत्ताच जागे व्हा'

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचा पुनर्विचार करण्याची गरज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्तवलीय. तर पक्षीय मतभेद विसरून दुष्काळावर काम करूया, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. 'लोकहो आत्ताच जागे व्हा,' असं सांगायलाही ते विसरलेले नाहीत. 'भारत4इंडिया'नं ही परिस्थिती ओळखून अगोदरपासूनच 'जागर पाण्याचा' घालायला सुरुवात केलीय.

मित्र फाऊंडेशन या संस्थेनं 'पाणी पेटतंय' या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात हे दोन्ही नेते बोलत होते. राज्यातली दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून तिचा सामना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून केला पाहिजे, असा एकूणच या परिसंवादाचा सूर होता. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दुष्काळ वाढतोय

कायम दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढतेय, ही गंभीर बाब असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी निदर्शनास आणलं. राज्यात १९६० मध्ये ६० तालुके दुष्काळग्रस्त होते, तर १९८४ मध्ये तोच आकडा ८७ झाला. आज तोच आकडा १३५ पर्यंत गेलाय. त्यामुळं आता मोठी आणि मध्यम धरणं बांधावीत का, याचाही विचार करावा, असं सांगत मुंडे यांनी आतापर्यत ज्या मोठ्या धरणांचं काम फक्त १५ ते २० टक्के एवढंच झालंय, ती रद्द करावीत, अशी भूमिका मांडली. इथून पुढं चेक डॅम, साखळी धरणं बांधावीत. गावातलं पाणी गावातच जिरवावं, असं सांगताना राजकीय विरोधकांची जिरवण्यापेक्षा पाणी जमिनीत जिरवण्याची वेळ आली आहे, अशी राजकीय टोलेबाजीही त्यांनी केली.

ऊस शेतीचा पुनर्विचार करा

राज्यात उसाच्या शेतीसाठी ८० टक्के पाणी जातं. त्याचा पुनर्विचार करायला हवा. तसंच समन्यायी पाणीवाटप करण्याची भूमिकाही मांडण्याची गरज आहे. आता १२ महिने पाणी देण्याऐवजी सहामाही आणि चारमाही पाणीवाटपाचं धोरण आखावं लागेल, अशीही सूचना मुंडे यांनी केली. राज्यातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रानं जो आंतरराज्य नदीजोड प्रकल्प राबवला होता, त्या धर्तीवर राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्प राबवल्यास सह्याद्रीच्या खोऱ्यात वाया जाणारं पाणी इतर खोऱ्यांत वळवता येईल. आता पावसाचं एक थेंबही पाणी समुद्राला जाणार नाही, याचा विचार करून धोरण आखायला हवं, असंही मुंडे यांनी सूचित केलं.

पाण्याअभावी स्थलांतर

या वर्षी पाण्याची परिस्थिती गंभीर झाली असून लोकांचं स्थलांतर सुरू झालंय. ५० टक्के पशुधन आताच लोकांनी विकून टाकलंय. त्यामुळं मी अतिशय चिंतेत आहे, सरकारनं ४५० कोटींचा निधी यासाठी ठेवलाय. पण त्यानं काही होणार नाही, असंही मुंडे म्हणाले. जिल्ह्या्जिल्ह्यात पाण्यावरून लोकांमध्ये संघर्ष सुरू झालाय, ही गंभीर बाब आहे. त्यामुळं विचलित न होता पक्षभेद बाजूला ठेवून, विभागांचे भेद बाजूला ठेवून आता या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झगडावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

पाणी वापराबद्दल गंभीर राहा - भुजबळ

राज्यातली पाण्याची स्थिती गंभीर असल्यानं आता मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांतील सर्वांनीच गाभीर्यानं पाण्याचा वापर करावा, असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं. आता खेड्यातल्या सामान्य माणसाला वाचवायचं असेल तर सर्व पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करायला हवं. आता तुम्ही तुमचे झेंडे घरात ठेवा, आम्हीं आमचे झेंडे बाजूला ठेवतो. येत्या पावसळ्यापर्यंत लोकांसाठी काम करूया. कारण जर हे लोकच राहिले नाहीत, तर राजकारण तरी कुणाच्या जीवावर करणार, असा सवालही त्यांनी केला.

सरकार दुष्काळासाठी सर्व काही करील. त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल, पण गावपातळीवर चारा, ठिबक सिंचन योजना यामध्ये मात्र घोटाळा करता कामा नये, अशी मौलिक सूचनाही भुजबळांनी केली.

लोकहो आत्ताच जागे व्हा!

पाण्याच्या वापरावर सर्वांनीच काटकसरीचं धोरण आखावं, असं सांगत काही उपायही त्यांनी सांगितले. त्यामध्ये नदी, तलाव, विहिरी असे जलसाठे दूषित होऊ देऊ नयेत. नदीपात्रात विंधन विहिरी खोदाव्यात, नदीपात्र, तलाव यातील गाळ काढून आताच त्यात दुरुस्ती करावी, तसंच बांधकाम आणि रस्त्यांसाठी लागणारी खडी शेताजवळ खड्डे काढून मिळवावी, जेणेकरून पावसाचं पाणी तिथं साचेल आणि त्यामुळं भूजल पातळी वाढेल. जाता जाता भुजबळांनी एक इशाराही दिलाय, सध्या शहरात पाण्याची टंचाई नाही, जर आताच विचार केला नाही आणि सगळे खेड्यातले लोक शहराकडं वळले तर खूप मोठी अडचण निर्माण होईल, त्यामुळं लोकहो आत्ताचं जागे व्हा.

यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रणेते पोपटराव पवार यांनीही मौलिक सूचना केल्या.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.