टॉप न्यूज

राजू शेट्टींचा एल्गार

ब्युरो रिपोर्ट

सांगली - ऊस आंदोलनाची धग अजून पूर्णपणं निवलेली नाहीये. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतेय. हा लढा दुष्काळी भागातल्या जनतेसाठी असणार आहे.  13 जानेवारीला या लढ्याची सुरुवात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव तालुक्यातील मांजरडे गावात होणाऱ्या दुष्काळ निर्मूलन परिषदेनं होणारेय.  

दुष्काळ निर्मूलन परिषद

पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना अपूर्ण राहिल्यानं सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना मागील वर्षी भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं.  अनेक भागांत शेतकऱ्यांनी  चारा आणि पाण्यासाठी आंदोलनं केलीत तरीही दुष्काळावर उपाययोजना झालेल्या नाहीत.  त्यामुळं शेवटी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यांसाठी लढ्यात उतरणार आहे. तशी घोषणाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.  या लढ्याची सुरुवात 13 जानेवारीपासून तासगाव तालुक्यातल्या मांजरडे गावात दुष्काळ निर्मूलन परिषदेनं केली जाणार आहे. 

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा

या आंदोलनाचा पहिला टप्पा दीड महिने सुरू राहणार असून यामध्ये राजू शेट्टी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.  अपूर्ण सिंचन योजना पूर्ण कराव्यात, अशी या परिषदेची आग्रही मागणी आहे.  या मागणीकडं दुर्लक्ष झाल्यास सरकारला दुष्काळाचे चटके देऊ, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.