टॉप न्यूज

जगभरातील 35 प्रजातींचं होतंय संगोपन

प्रवीण मनोहर

अमरावती - वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं संगोपन होतंय. जगातील सर्वात उंच 100 फूट बांबूही इथं पहायला मिळतो.

वडाळी वनपरिक्षेत्रातील ही रोपवाटिका एक नवी ओळख घेऊन पुढे आली आहे. ही रोपवाटिका तशी 1995पासून सुरू झाली. मात्र 2006पासून या ठिकाणी बांबूची रोपं तयार करण्याचं काम सुरू झालं.  पुढे 2006 मध्ये राष्ट्रीय बांबू अभियान जाहीर झालं. यात बांबूच्या प्रजातीच्या प्रचाराचा आणि दुर्मिळ जाती संगोपनाचा कार्यक्रम जाहीर झाला. हे अभियान सुरू व्हायच्या आधीच अमरावती इथं बांबू क्षेत्रात एवढं मोठं काम सुरू होतं. परदेशातून आणि परराज्यातून बांबूच्या प्रजाती आणून इथं त्यांना जगवणं हे जिकिरीचंच काम होतं. परंतु वनपाल सय्यद सलीम अहमद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान लीलया पेललं. आज या रोपवाटिकेकडं बांबू संशोधन केद्रं म्हणून पाहिलं जातं.

बांबूचे प्रकार

या रोपवाटिकेत बासरीचा बांबू, पोलीसदादाच्या लाठ्यांचा बांबू, छप्पर उभारण्यासाठी; तसंच शेती उपयोगी साहित्य निर्मिती आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बांबूची लागवडीयोग्य रोपं इथं तयार होतात. येथील बांबूंपासून बनवलेली टुमदार झोपडी पर्यटकांना आकर्षित करते. बांबूवर प्रक्रिया करून त्याचा प्लाय बनवून ही झोपडी बनवली गेलीय. ही झोपडी उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उबदार राहते. शिवाय पावसाळ्यातही पाण्यापासून चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकते.

शेतकऱ्यांकडून मागणी वाढतेय

बांबूचा उपयोग हा मृद संधारणाच्या संदर्भात फार महत्त्वपूर्ण आहे, जमिनीची धूप रोखण्यासाठी शेतकरी बांबूची लागवड आपल्या शेताच्या धुऱ्यावर म्हणजेच कडेकडेनं करतात. ज्यामुळं शेतातील माती वाहून जात नाही. बांबू मुळाशी माती धरून ठेवतात आणि या बांबूला बाजारात मागणीही चांगली आहे. त्यामुळं दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी इथून बांबूची रोपं विकत नेतात. गत पावसाळ्यात साडेचार लाख रुपयांची रोपं विकली गेली. ज्यामुळं शेतकरी आणि बांबूचं नातं अधिक पक्क होताना दिसून येतं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.