टॉप न्यूज

अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी

ब्युरो रिपोर्ट

मुंबई/नाशिक - तपमानाचा पारा भलताच उतरल्यानं उत्तर भारतासह अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरलीय. गावागावांत शेको़ट्या पेटल्या असून अवघा मराठी मुलुख उबदार कपड्यांनी लपेटलाय. आज (रविवार) राजधानी दिल्लीमध्ये पहाटे या मोसमातील सर्वात कमी १ डिग्री तपमानाची नोंद झाली. तर राज्यातील सर्वात कमी तापमान निफाडला (जि. नाशिक) 2.7 अंश सेल्शिअस एवढं नोंदलं गेलं.

गोठवणाऱ्या या थंडीचा फटका द्राक्षासह डाळिंबाला बसणार आहे. नाताळपासून वाढत चाललेल्या थंडीनं आता उच्चांक गाठलाय. कधी नव्हे ते मुंबईकरसुद्धा गारठलेत.

राज्यात सर्वात कमी तापमान निफाड पाठोपाठ नाशिकमध्ये 4.4 डिग्री एवढं नोंदलं गेलं. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तपमानाचा नीचांक नोंदविण्यात येत होता. आज पारा आणखी घसरून १.९ डिग्री तपमानाची नोंद झाली. त्यामुळं दिल्लीकर अक्षरश: गोठून गेलेत. उत्तर भारतात आजपर्यंत थंडीमुळं १४० जणांचा गारठून मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशात सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, गेल्या चोवीस तासांत थंडीनं १० जणांचा बळी घेतलाय.

थंडी वाढणार?

शनिवारी सकाळी निफाडचं तपमान ३.१ डिग्री तर नाशिकमधील तपमान ७.४ डिग्री इतकं होतं. मुंबईतील तपमानही १२.४ डिग्रीपर्यंत घसरलं होतं. मात्र, मुंबईत रविवारी पारा आणखी १२ डिग्रीपर्यंत घसरला. सोमवारी पारा ११ डिग्रीपर्यंत घसरेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळं मुंबईतील तपमान कमी होत चाललं आहे. याच प्रभावामुळं भारत, पाकिस्तान, इराणमधील काही भागांत पाऊस पडला. तर भारतातील काही भागांत बर्फवृष्टीही झाली. वाऱ्याचा हा प्रभाव ओसरेपर्यंत थंडीचा मुक्काम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.