टॉप न्यूज

गरिबांच्या घोंगड्या पांघरून प्रशासन सुस्त

प्रवीण मनोहर

अमरावती - रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यासाठी ब्लँकेट, चादरी आल्यात. परंतु अमरावती जिल्हा परिषदेला आठ महिने झाले तरी त्यांचं वाटप करायला वेळ मिळालेला नाही. रक्त गोठवणारी थंडी पडतेय, गरीब बिचारे पुरेशा अंथरूण-पांघरुणाअभावी काकडतायत. दुसरीकडं ही त्यांच्या हक्काची ऊब प्रशासनानं कुलूपबंद करून ठेवलीय.

कोट्यवधींचं साहित्य

लाभार्थ्यांना 2ब्लँकेट, 2चादरी आणि सौर कंदील देण्याची ही योजना आहे. त्यासाठी अमरावती जिल्हा परिषेदला 29 हजार 540 चादरी, तसंच28 हजार 540 ब्लँकेट आणि 590 सौर कंदील मे 2012 मध्येच प्राप्त झालेत. ही ब्लँकेट आणि चादरी अहिल्यादेवी होळकर सह. संस्था मर्या. पंढरपूर यांनी पुरवलीत. एका ब्लँकेटची किंमत 522रु. तर एका चादरीची किंमत 369 रु. आहे. या संपूर्ण साठ्याची एकूण किंमत 2कोटी 57 लक्ष 98हजार 140रुपयांवर जाते. एवढे पैसे खर्च करून आलेलं  उपयोगी साहित्य लाभार्थ्यांना वाटण्यातच आलं नाही. एक वेळ ठीक आहे. एवढे दिवस गेले, पण आता मरणाची थंडी पडत असताना तरी जाग येऊन प्रशासनानं त्याचं वाटप करायला पाहिजे ना? पण अजून हे सर्व साहित्य जसं आलं तशाच पॅकबंद स्थितीत सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये पडून आहे.

प्रशासन ढिम्मच

सध्या दिल्लीपासून गल्ल्यांपर्यंत सर्वच जण थंडीनं गारठलेत. दिल्लीचा पारा 1.9 पर्यंत, तर राज्याचा किमान 2.7 अंश सेल्शिअसपर्यंत (निफाड) खाली घसरलाय. विदर्भातही रक्त गोठवणारी थंडी आहे. सुखवस्तू कुटुंबात ऊबेसाठी वॉर्मर लागलेत. याशिवाय प्रत्येक जण स्वेटर, हॅण्डग्लोव्हज, शॉल घेऊन ऊब घेतायत. परंतु दारिद्र्य रेषेखालील गरिबांना शेकोटीशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नाही. त्यांच्यासाठी मायबाप सरकारनं सोय केलीय आणि दुसरीकडं प्रशासनानं ते गरजेला त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, याची काळजी घेतलीय.

गरीब कुडकुडतायत...

अमरावती नजीकच्या बेलोरा गावातील या आहेत सत्यभामा पाटील. त्यादेखील या योजनेच्या लाभार्थी आहेत. आम्ही गेलो त्यावेळी जमिनीवर प्लास्टिकची चटई अंथरूण त्यावर कुडकुडत बसलेल्या सत्यभामाबाईंनी आमचं स्वागत केलं. त्या म्हणाल्या..."बापा यावर्षी मरणाची थंडी आहे, या थंडीत घरात जे काही फाटकंतुटकं आहे तेच अंथरूण पांघरून आम्ही कशीबशी रात्र काढतो. त्यातच गावात सात ते दहापर्यंत लोडशेडिंग असतं. गावात घासलेटवाला लवकर येत नाही. मग लाईट गेल्यावर निरा अंधार राहतो, काय करावं बापा... लयच थंड पडली, चला शेकोटीला बसू आन बोलू,'' असं सांगून हे कुटुंब शेकोटीच्या ऊबेला गेलं. वाटपाअभावी पडून राहिलेल्या या साहित्याच्या लाभार्थ्यांची अशीच अवस्था आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे मुख्याधिकारी अहमद यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करा, असं सांगितलं. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आनंद जगताप यांनी याबाबत सांगण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांना ही परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करून पडिक साहित्याचं तातडीनं वाटप करू, असं आश्वासन दिलं. आता त्याचं आश्वासन तातडीनं योग्य वेळी पूर्ण होणार की थंडी संपल्यावर उन्हाळ्यात, हे पाहायला मिळेलच.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.