टॉप न्यूज

खंडोबारायाची चंपाषष्ठी यात्रा

विवेक राजूरकर

औरंगाबाद -  मराठवाड्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा गावातील खंडोबारायाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा ते षष्ठी अशी भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबाचा हा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात मोठ्या थाटात साजरा होतो. मार्गशीर्ष ७ शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असा हा उत्सव असतो. खंडोबाला प्रिय असणाऱ्या चाफ्याच्या फुलांनी देवाची पूजा बांधतात, त्यामुळं या दिवसाला 'चंपाषष्ठी' असं म्हणतात.

इ.स.पूर्व ४०० वर्षांपेक्षाही अधिक कालापासून इथं यात्रा भरते. दरवर्षी सहा दिवस चालणारी यात्रा यावेळी मात्र प्रतिपदा आणि व्दितीया एकाच दिवशी आल्यानं पाच दिवसच झाली. यळकोट यळकोट जय मल्हार... असा जयघोष करत भंडारा (हळदीच्या चुर्णाला भंडारा म्हणतात) आणि रेवड्या उधळल्या जातात. रुद्राभिषेक करून खंडोबारायाला पुरणाची पोळी, कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत त्याला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. मल्हारी, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत, मैलार अशा अनेक नावांनी खंडोबाला ओळखतात.

जिल्ह्यात बीड बायपासजवळ असलेल्या सातारा परिसरात खंडोबाचं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराशी याचं साम्य आहे. या मंदिराची उंची ७१ फूट असून लाल दगड, विटा आणि चुन्यानं या मंदिराचं बांधकाम झालंय. या मंदिराचा जीर्णोध्दार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केल्याचा उल्लेखही आढळतो. इतिहासकालीन सातारा हे गाव हैदराबाद संस्थानात एक नावाजलेलं गाव म्हणून ओळखलं जाई. चंपाषष्ठीच्या उत्सवासाठी इथल्या जहागीरदाराकडून या मंदिरासाठी देणगी, पूजा साहित्य आणि इतर साधनसामग्री पुरवली जात असे.  

चंपाषष्ठीला देव जहागीरदार यांच्या वाड्यात दर्शन देण्यासाठी एक दिवस येतात अशी आख्यायिका आहे. याबाबत इथले पुजारी विजय धुमाळ यांनी ही कथा सांगताना म्हटलं की, "जहागीरदार हे खंडोबाचे मोठे भक्त होते. खंडोबाचं वास्तव्य गडावर असल्यामुळं म्हातारपणात जहागीरदाराला गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेता येत नव्हतं. त्यामुळं त्यानं खंडोबाला विनंती केली... देवा खंडोबाराया तू एक दिवस आमच्यासाठी गडावरून खाली येऊन आम्हाला दर्शन दे. खंडोबानं त्याची विनंती मान्य केली आणि चंपाषष्ठीला देव जहागीरदाराच्या वाड्यात येऊ लागला." परंपरेनुसार आजही जहागीरदार दांडेकर कुटुंबीय ही परंपरा जोपासत आहे. यावेळीही चंपाषष्ठीला सकाळी खंडोबाची पालखी वाजतगाजत दांडेकर यांच्या वाड्यात आणण्यात आली. जहागीरदार यांच्या वाड्यावर पानसुपारीचा कार्यक्रम झाला. 

ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलेल्या मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी या परिसरात हाहाकार माजवला होता. या दोघांनी मणिचूल पर्वतावर तप करणाऱ्या सप्तर्षींनाही त्रास द्यायला सुरुवात केली. इथली तपोभूमी या दैत्यांनी नष्ट केली. या त्रासाला कंटाळून सर्व ऋषिमुनींनी भगवंतांचा धावा केला. शेवटी भगवान शंकरानं या दैत्यांचा नाश करण्यासाठी मार्तंड भैरवाचं रूप धारण केलं आणि कार्तिकेयासहित आपल्या सात कोटी गणांचं सैन्य (म्हणजेच यळकोट) घेऊन मणिचूल पर्वतावरील मल्ल आणि मणी या दैत्यांशी युद्ध केलं. शेवटी मणी आणि मल्ल मार्तंड भैरवाला शरण आले. मणीनं सदैव मार्तंडाच्या चरणी राहण्याचा वर मागितला, तर मल्लानं मार्तंड भैरवाच्या नावात स्वतःचं नाव धारण करण्याचा वर. या दोघांची इच्छा मार्तंड भैरवानं पूर्ण केली आणि त्यामुळं मल्लारी मार्तंड हे नाव पुढं प्रचलित झालं. अशी ही आख्यायिका. 

विवाह झाल्यानंतर खंडेरायाचं दर्शन घेऊन जागरण-गोंधळ घालण्यासाठी नवदाम्पत्यांची इथं गर्दी होते. मंदिराबाहेर विक्रेत्यांनी खेळाचं साहित्य, पूजेचं साहित्य, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. हा चंपाषष्ठीचा सोहळा पाहण्यासाठी अनेक जिल्ह्यांतून, राज्यांतून भाविकांनी गर्दी केली होती. वाघ्या-मुरळी, तुणतुणं, डफ, टाळ-मृदंगाच्या गजरात अहोरात्र खंडोबाचा नामाचा गजर करत दिवट्या तेवत होत्या. महाराष्ट्रातील अनेक कला लोप होत असताना औरंगाबादच्या साताऱ्याच्या खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त या कलांचा संगम इथं पाहायला मिळतो.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.